नदालची कमाल! अँडरसनला नमवत तिसऱ्यांदा केला अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर कब्जा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 04:25 AM2017-09-11T04:25:21+5:302017-09-12T01:08:28+5:30

स्पेनच्या राफाएल नदालची जादू टेनिस कोर्टवर पुन्हा एकदा पाहायला मिळाली. एकतर्फी झालेल्या अंतिम लढतीत नदालने रशियाच्या पीटर अँडरसनवर 6-3, 6-3, 6-4 अशी मात करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

Nadal's awesome! Anderson clinches third place in US Open |  नदालची कमाल! अँडरसनला नमवत तिसऱ्यांदा केला अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर कब्जा

 नदालची कमाल! अँडरसनला नमवत तिसऱ्यांदा केला अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर कब्जा

न्यू यॉर्क, दि. 11 - पुरुष एकेरीतील अव्वल टेनिसपटू असलेल्या  राफाएल नदालची जादू टेनिस कोर्टवर पुन्हा एकदा पाहायला मिळाली. रविवारी रात्री  झालेल्या एकतर्फी अंतिम लढतीत नदालने रशियाच्या पीटर अँडरसनवर 6-3, 6-3, 6-4 अशी मात करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. नदालचे हे या स्पर्धेतील तिसरे आणि एकूण 16 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. नदालने याआधी 2010 आणि 2013 मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. तसेच यावर्षी फ्रेंच ओपनच्या विजेतेपदावरही त्याने कब्जा केला होता. 
एकतर्फी झालेल्या या लढतीवर नदालने पूर्ण वर्चस्व गाजवले. त्याने पहिल्या सेटमध्ये 6-3 ने बाजी मारत सामन्यात दणक्यात सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही नदालचाच बोलबाला दिसून आला. तर पीटर अँडरसन नदालच्या अनुभवासमोर पूर्णपणे निष्प्रभ ठरल्याचे दिसत होते. अखेर हा सेटही नदालने 6-3 ने जिंकत सामन्यात आघाडी घेतली. 
पहिले दोन सेट जिंकल्यानंतर तिसऱ्या सेटमध्येही नदाल अगदी विजेत्याच्या थाटात खेळला. पीटर अँडरसनकडून वारंवार होत असलेल्या चुकांचा त्याने अचूक फायदा उचलला. पण शेवटच्या दोन-तीन गेममध्ये अँडरसनने नदालला कडवी टक्कर दिली. अखेर हा सेटही 6-4 ने जिंकत नदालने अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर नाव कोरले. 


  - 2017 वर्षातील नदालचे हे पाचवे, तर कारकिर्दीतील ७४ वे विजेतेपद.
- 4 वेळा नदालने एका वर्षात दोन ग्रँडस्लॅम पटकावण्याची कामगिरी केली.
- 34व्या प्रयत्नानंतर अँडरसनने पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठली होती.
 - 1965 साली क्लिफ डिसडेल यांच्यानंतर यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहचणारा अँडरसन पहिला दक्षिण आफ्रिकी खेळाडू ठरला.
 - 1981 साली आॅस्टेÑलियन ओपनमध्ये बाजी मारणारा जोहान क्रिक दक्षिण आफ्रिकेचा अखेरचा ग्रँडस्लॅम विजेता आहे. यानंतर अँडरसनकडे ग्रँडस्लॅम जेतेपदाची संधी होती.

हिंगिसचे २५वे ग्रँडस्लॅम जेतेपद...

स्वित्झर्लंडची दिग्गज खेळाडू मार्टिना हिंगिस हिने तैवानच्या चान यंग जान हिच्यासोबत खेळताना यूएस ओपन महिला दुहेरीचे जेतेपद उंचावले. दखल घेण्याची बाब म्हणजे यासह हिंगिसने आपल्या कारकिर्दीतील तब्बल २५वे आणि महिला दुहेरीतील एकूण १३वे ग्रँडस्लॅम जिंकले.
हिंगिस - जान यांनी अंतिम फेरीत लुसी -हादेका - कॅटरिना सिनियाकोवा या झेक प्रजासत्ताकच्या जोडीचा ६-३, ६-२ असा धुव्वा उडवला. ग्रँडस्लॅम इतिहासामध्ये हिंगिसने ५ वेळा एकेरीमध्ये तसेच ७ वेळा मिश्र दुहेरीतही जेतेपद जिंकली आहेत.
 
दुहेरी जेतेपदाची जाणीव मला काही वेळाने होईल. २५ ग्रँडस्लॅम पटकावणे शानदार ठरले. मला माझ्या कामगिरीचा अभिमान आहे. मी एकेरीमध्ये परतण्याचा विचार करणार नाही. मी मिश्र व दुहेरीतच योग्य असून मी माझ्या काही चांगल्या जोडीदारांवर अवलंबून आहे. - मार्टिना हिंगिस

 

महिला एकेरीत स्लोएन स्टिफन्स अजिंक्य

अत्यंत एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात धडाकेबाज खेळ केलेल्या स्लोएन स्टीफन्स हिने मेडिसन किजचा अवघ्या एका तासामध्ये धुव्वा उडवत यूएस ओपन महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. अमेरिकन खेळाडूंमध्ये झालेल्या या लढतीत स्टीफन्सने बाजी मारत कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद उंचावले. विशेष म्हणजे डाव्या पायाला झालेल्या दुखापतीनंतर स्टीफन्सने ११ महिन्यांच्या कालावधीनंतर टेनिस कोर्टवर पुनरागमन केले होते.
स्टीफन्सने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठे जेतेपद उंचावताना किजचा ६-३, ६-० असा सहज धुव्वा उडवला. त्याचप्रमाणे, २००२ नंतर पहिल्यांदाच यूएस ओपनची अंतिम लढत अमेरिकन खेळाडूंमध्ये झाली. स्टीफन्सने या वेळी बिगरमानांकित खेळाडू म्हणूनही
छाप पाडली. याआधी २००९ मध्ये किम क्लाइस्टर्सने निवृत्तीनंतर पुनरागमन करताना बिगरमानांकित खेळाडू म्हणून यूएस ओपनचे जेतेपद उंचावले होते.

Web Title: Nadal's awesome! Anderson clinches third place in US Open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा