लाईन्सवुमनसोबतचे गैरवर्तन नडले, नोव्हाक जोकोविक अमेरिकन ओपनमधून बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 10:13 AM2020-09-07T10:13:45+5:302020-09-07T10:22:43+5:30
US Open 2020 : जोकोविकने झाल्याप्रकाराबाबत इन्स्टाग्रामवरून खेद व्यक्त केला आहे. तसेच ही घटना दु:खद आणि चुकीची असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे.
न्यूयॉर्क - पुरुष एकेरीच्या जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू आणि यंदाच्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील विजेतेपदाचा प्रबळ दावेदार नोव्हाक जोकोविकला स्पर्धेतून धक्कादायकरीत्या बाहेर पडावे लागले आहे. रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कोर्टवर संतापाच्या भरात लाइन्सवुमनवर बॉल मारल्याने आयोजकांनी जोकोविकला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान, जोकोविकने झाल्याप्रकाराबाबत इन्स्टाग्रामवरून खेद व्यक्त केला आहे. तसेच ही घटना दु:खद आणि चुकीची असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे.
सर्बियाचा स्टार टेनिसपटू असलेल्या नोवाक जोकोविकबाबत पत्रक प्रसिद्ध करून यूएसटीएने या कारवाईला दुजोरा दिला आहे. ग्रँडस्लॅमच्या नियमानुसार कुठल्याही खेळाडूने कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा प्रेक्षकाला जखमी केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून त्याला स्पर्धेतून बाद करण्यात येते. सामनाधिकाऱ्यांनी या प्रकाराबाबत जोकोविकला दोषी पाहिले आहे.
नियमानुसार अमेरिकन ओपनच्या उपउपांत्यफेरीपर्यंत पोहोचण्याबाबत जोकोविकला जी रक्कम मिळणार आहे त्यामधून दंडाची रक्कम कापून घेतली जाईल. तसेच या चुकीसाठी जोकोविकचे रँकिंग पॉईंटसुद्धा घटवण्यात येणार आहेत. नोव्हाक जोकोविक जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा खेळाडू आहे. मात्र लाइन्सवुमनवर चेंडू मारल्याने त्याला स्पर्धेतून बाहेर करण्यात आले आहे. यंदाच्या स्पर्धेतील विजेतेपदासाठी त्याला प्रबळ दावेदार मानण्यात येत होते.
उपउपांत्य फेरीच्या या लढतीत जोकोविकला पहिला सेट जिंकण्यात अपयश आले होते. तसेच सर्व्हिस ड्रॉप झाल्याने तो निराश होत होता. तसेच ५-६ या स्थितीतून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना नैराश्यामधून त्याने चेंडू मागच्या दिशेने मारला. हा चेंडू थेट जाऊन लाइनवुमन्सला लागला. मात्र यानंतर जोकोविकने सामनाधिकाऱ्यांकडे माफी मागितली.
या प्रकारानंतर जोकोविकला बाद करण्यात आल्याने स्पेनचे पाब्लो कार्रेनो बुस्टा उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. दरम्यान, फेडरर आणि राफेल नडाल यांनी आधीच स्पर्धेतून माघार घेतलेली असल्याने स्पर्धेला नवा विजेता मिळण्याची शक्यता आहे.