सहा वेळचा चॅम्पियन नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 05:56 PM2018-01-22T17:56:43+5:302018-01-22T18:02:20+5:30
सहा वेळा ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव कोरणाऱ्या नोवाक जोकोविच याचे ऑस्ट्रेलियन ओपनमधील आव्हान संपुष्टात आलं आहे.
मेलबर्न : सहा वेळा ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव कोरणाऱ्या नोवाक जोकोविच याचे ऑस्ट्रेलियन ओपनमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. दुखापतीतून सावरणाऱ्या नोव्हाक जोकोविचला चौथ्या फेरीत चुंग हेयोनकडून पराभवाचा सामना करावा लागला. मेलबर्नच्या तापमानात वाढ झाल्याने खेळाडूंना चांगलाच घाम गाळावा लागला. चुंग हेयोनने जोकोविचला सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले. दक्षिण कोरियाच्या चुंग हेयोननं 7-6, 7-5, 7-6 अशा फरकानं सर्बियाच्या नोवाक जोकोविचवर विजय मिळवला. या पराभवानंतर नोवाक जोकोविचचे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
पुढील फेरीत दक्षिण कोरियाच्या चुंग हेयोनचा सामना टैनिस सँडग्रेन याच्यासोबत होणार आहे. टैनिसनं नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत पाचव्या स्थानावरील डोमिनिकचा पराभव केला होता. जोकोविचचा पराभव केल्यामुळं चुंग हेयोनचा आत्मविश्वास चांगलाच वाढला असेल. त्यामुळं दोघातील सामना चांगलाच रंगतदार होण्याची शक्याता आहे.
पराभवाच्या भीतीपोटी जोकोविचने घेतला होता ध्यानाचा आधार -
स्पर्धेतील पराभवाची भीती आणि तणावापासून दूर राहण्यासाठी सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ध्यानाचा आधार घेतला होता. तरीही तो आपला पराभव टाळू शकला नाही. मेडिटेशनमुळे त्याला बरीच मदत होत असल्याचेही त्याने सांगितले होतं.
काय म्हणाला होता जोकोविच -
‘स्पर्धेतील चौथ्या फेरीतील जागा पक्की करण्याचा दबाव आहे. यासाठी मी रोज ध्यान करतो. यातून मला काय मिळते हे मी सांगू इच्छित नाही; परंतु यात मी मग्न होऊन जातो. चिंता आणि तणावापासून मी मुक्त होण्याचा हा उत्तम मार्ग आहे.
पेस-राजा पराभूत-
भारताची अनुभवी जोडी लिएंडर पेस आणि पूरव राजा यांना पुरुष दुहेरीतील उपउपांत्यपूर्व सामन्यात युआन सेबेस्टियन कबाल आणि रॉबर्ट फराह या जोडीकडून पराभवाचा सामना करावा लागला. बिनमानांकित भारतीय जोडीला १ तास ९ मिनिटांच्या सामन्यात ११ व्या मानांकित जोडीने ६-१, ६-२ ने सरळ सेटमध्ये पराभूत केले. अमेरिकन ओपन २०१७मध्ये ही जोडी दुस-या फेरीतून बाहेर पडली होती. गेल्या एक वर्ष आणि अधिक वेळेपासून लिएंडर पेसला स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नाही.
वोज्नियाकी-नवारो सामना रंगणार-
महिला गटात कॅरोलिन वोज्नियाकी हिने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना स्पेनची अनुभवी खेळाडू कार्ला सुआरेज नवारो हिच्याविरुद्ध होईल. ढगाळ वातावरण असतानाही वोज्नियाकीने शानदार प्रदर्शन केले आणि पहिल्या ग्रॅण्डस्लॅम विजयाची दावेदारी अधिक मजबूत केली. तिने मॅगडालेना रिबरिकोव्हाचा ६-३, ६-० ने पराभव केला. दुसरीकडे, स्पेनच्या नवारोने एस्टोनियाविरुद्ध ४-६, ६-४, ८-६ ने विजय नोंदवला. नवारो ही आपल्या विजयाचे श्रेय आक्रमकतेला देते.