आता लक्ष्य ग्रॅन्डस्लॅम, ऑलिम्पिक पात्रता फेरी! ऋतुजा भोसले : बोपन्नासोबत खेळणे स्वप्नवत होते!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 05:58 AM2023-10-17T05:58:54+5:302023-10-17T05:59:01+5:30
ऋतुजा- बोपन्ना जोडीने हांगझाऊ आशियाडमध्ये मिश्र दुहेरीत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले.
नवी दिल्ली : रोहन बोपन्नासारख्या अनुभवी खेळाडूसोबत खेळायला मिळणे माझ्यासाठी स्वप्नवत प्रवास होता. त्याच्यासोबतीने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकण्याचा क्षण स्वप्नपूर्ती देणारा ठरला. आता ग्रॅन्डस्लॅम आणि पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता गाठणे हे आपले लक्ष्य असल्याचे मत अनुभवी टेनिसपटू ऋतुजा भोसले हिने व्यक्त केले.
ऋतुजा- बोपन्ना जोडीने हांगझाऊ आशियाडमध्ये मिश्र दुहेरीत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. याविषयी विचारताच ऋतुजा म्हणाली, ‘रोहनने माझ्यासोबत मिश्र दुहेरी खेळण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी आश्चर्यचिकत झाले. स्वत:वर विश्वास नव्हता. खरेतर मी एकेरी किंवा महिला दुहेरीत खेळते. आशियाडमध्ये तीन स्पर्धांमध्ये सहभागी होणे हा माझ्यासाठी शानदार अनुभव होता.’ ‘आता माझे लक्ष्य पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता गाठणे हे असेल. टेनिसमध्ये कोटा पद्धत नसल्याने ऑलिम्पिकच्या दोन महिन्यांआधी कोण खेळणार, हे निश्चित होईल. याशिवाय ग्रॅन्डस्लॅममध्ये सहभागी होण्यासाठी रॅंकिंग सुधारण्यावर भर असेल,’ असे ऋतुजा म्हणाली.
भारतीय टेनिसचे भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वास व्यक्त करीत ऋतुजाने सांगितले की, ‘रोहन सध्या खेळत असून दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल पाचमध्ये आहे. अंकिता रैना, करमन कौर, सुमित नागल आणि मी स्वत: सतत खेळत आहोत. आमच्याकडे प्रतिभा कमी नाहीत. भारतीय टेनिसपटूंचे चाहते जगभर आहेत.’