ओसाकाचा अमेरिकन ओपन जेतेपदावर कब्जा, व्हिक्टोरिया अजारेंका पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 12:36 AM2020-09-14T00:36:29+5:302020-09-14T06:09:40+5:30

जापानच्या ओसाका हिने बेलारुसच्या अजारेंकावर १-६, ६-३, ६-३ असा विजय मिळवला. हे तिचे दुसरे अमेरिकन ओपन आणि एकूण तिसरे ग्रॅण्डस्लॅम आहे.

Osaka captures US Open title, defeating Victoria Azarenka | ओसाकाचा अमेरिकन ओपन जेतेपदावर कब्जा, व्हिक्टोरिया अजारेंका पराभूत

ओसाकाचा अमेरिकन ओपन जेतेपदावर कब्जा, व्हिक्टोरिया अजारेंका पराभूत

Next

न्युयॉर्क : नाओमी ओसाका ने पहिल्या सेटमध्ये पिछाडीनंतर देखील जोरदार पुनरागममन करत व्हिक्टोरिया अजारेंकाला तीन सेटमध्ये पराभूत करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील विजेतेपद पटकावले.
जापानच्या ओसाका हिने बेलारुसच्या अजारेंकावर १-६, ६-३, ६-३ असा विजय मिळवला. हे तिचे दुसरे अमेरिकन ओपन आणि एकूण तिसरे ग्रॅण्डस्लॅम आहे. पहिला सेट गमावल्यावर दुसऱ्या सेटमध्ये एका ब्रेकने पिछाडीवर असलेल्या ओसाकाने विजेतेपद पटकावल्यावर सांगितले की, ‘मी विचार केला की एक तासाच्या आतमध्ये सामना गमावणे खुपच लाजिरवाणे असेल. मला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा होता.’ ओसाकाने प्रयत्न केले आणि जोरदार पुनरागमन करताना विजेतेपद पटकावले.
अमेरिकन ओपनमध्ये २५ वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला खेळाडूने अंतिम सामन्यात पहिला सेट गमावल्यावरही विजेतेपद पटकावले आहे. या आधी १९९४ मध्ये अरांत्जा सांचेज विकारियो हिने स्टेफी ग्राफ हिच्याविरुद्ध ही कामगिरी केली होती. २२ वर्षांच्या ओसाका हिचा जन्म जपानमध्ये झाला आहे. मात्र तीन वर्षांची असतानाच ती अमेरिकेत आली आणि आता कॅलिफोर्नियात राहत आहे.
विजेतेपद पटकावण्यासोबत वांशिक भेदभावाविरोधात आवाज उचलण्याच्या इराद्यानेच ओसाका यंदाच्या स्पर्धेत खेळत होती. (वृत्तसंस्था)

वंशभेदाविरोधात
उठवला आवाज

ओसाकाने शनिवारचा सामना खेळताना तामिर राईसचे नाव लिहलेला मास्क परिधान केला होता. या १२ वर्षांच्या कृष्णवर्णिय मुलाला २०१४ मध्ये पोलिसांनी ठार केले होते. स्पर्धेदरम्यान हा सातवा मास्क होता. ज्यात हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कृष्णवर्णिय नागरिकांच्या सन्मानार्थ तिने हे मास्क वापरले होते. याआधी ब्रियोना टेलर, एलिजाह मॅकक्लेन, ट्रेवोन मार्टिन, अहमद आरबेरी, जॉर्ज फ्लाईड आणि फिलांडो कास्टिल यांचे नाव लिहलेले मास्क होते. ओसाका हिने सांगितले ‘ माझी फक्त हीच इच्छा होती की लोकांनी याबाबत चर्चा सुरू करावी.’

ओसाकाचा सलग
११ वा विजय
बेलारुसची अजारेंका देखील तिसºया ग्रॅण्डस्लॅम जेतेपदासाठी दावेदारी करत होती. कोविड १९ च्या ब्रेकनंतर खेळ पुन्हा सुरू झाल्यापासून ओसाकाचा हा सलग ११ वा विजय आहे. या आधी ओसाकाने २०१८ मध्ये अमेरिकन ओपन आणि २०१९ मध्ये आॅस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद मिळवले होते. अजारेंकाने २०१२ आणि २०१३ मध्ये आॅस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले आहे.

मी विजयाबाबत विचार करत नव्हते. मला फक्त कडवे आव्हान द्यायचे होते. अशाच प्रकारे मी विजेतेपद मिळवण्यात यशस्वी ठरले. - ओसाका

Web Title: Osaka captures US Open title, defeating Victoria Azarenka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tennisटेनिस