पी. व्ही. सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक, सायना, प्रणयचे आव्हान संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:57 AM2017-11-17T00:57:22+5:302017-11-17T00:57:46+5:30
विद्यमान चॅम्पियन पी. व्ही. सिंधूने गुरुवारी चायना ओपन सुपर सीरिज प्रीमिअर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला;
फुजोऊ : विद्यमान चॅम्पियन पी. व्ही. सिंधूने गुरुवारी चायना ओपन सुपर सीरिज प्रीमिअर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला; पण अलीकडेच राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेली सायना नेहवाल व एच. एस. प्रणय यांचे आव्हान दुसºया फेरीत संपुष्टात आले.
जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानावर असलेली सिंधू या स्पर्धेत आव्हान कायम राखणारी एकमेव भारतीय आहे. सिंधूने महिला एकेरीमध्ये ४० मिनिटे रंगलेल्या एकतर्फी लढतीत जागतिक क्रमवारीत १०४ व्या स्थानावर असलेल्या चीनच्या हान युईचा २१-१५, २-१३ ने पराभव केला. आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला पुढच्या फेरीत पात्रता फेरीचा अडथळा पार करणाºया चीनच्या गाओ फांगजीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
सायना व प्रणय यांच्यासाठी आजचा दिवस निराशाजनक ठरला. या दोघांनी या महिन्यात नागपुरात खेळल्या गेलेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद पटकावले होते. सायनाला पाचव्या मानांकित जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध २१-१८, २१-११ ने पराभव स्वीकारावा लागला. जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानी असलेल्या प्रणयला ५३ व्या मानांकित हाँगकाँगच्या चियुक यिऊ लीविरुद्ध १९-२१, १७-२१ ने धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. सायनासाठी ही लढत आव्हानात्मक होती. कारण जपानच्या या खेळाडूविरुद्ध सायनाची कामगिरी चांगली नाही. या लढतीपूर्वी उभय खेळाडूंदरम्यान खेळल्या गेलेल्या तीन लढतींमध्ये यामागुचीने सरशी साधली. सायनाला या खेळाडूविरुद्ध चौथ्यांदा पराभव स्वीकारावा लागला.
येथे २०१४ मध्ये जेतेपद पटकावणाºया सायनाने ११-९ च्या आघाडीसह सुरुवात केली, पण यामागुचीने पहिला गेम २१-१८ ने जिंकला. त्यानंतर सायनाच्या कामगिरीचा ग्राफ खालावत गेला. दुसºया गेममध्ये सायनाला लयच गवसली नाही. जपानच्या खेळाडूला सायनाविरुद्ध खेळताना कुठलीही अडचण भासली नाही. तिने दुसरा
गेम जिंकत केवळ ३७ मिनिटांमध्ये विजय साकारला.
जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानावर असलेल्या प्रणयला तुलनेने कमकुवत असलेल्या प्रतिस्पर्ध्याने ४२ मिनिटांमध्ये पराभूत केले. सुरुवातील उभय खेळाडू बरोबरीत होते; पण हाँगकाँगच्या खेळाडूने लवकरच दोन गुणांची आघाडी घेतली. प्रणयने पुनरागमनाचा प्रयत्न केला, पण लीने ब्रेकपर्यंत ११-९ अशी आघाडी घेतली होती. ब्रेकनंतर प्रणयने पुन्हा प्रयत्न केला; पण त्याला यश मिळाले नाही. लीने पहिला गेम २१-१९ ने जिंकला. दुसºया गेममध्ये प्रणयने ब्रेकपर्यंत
एका गुणाची आघाडी कायम
राखली होती; पण त्यानंतर लीला रोखण्यात तो अपयशी ठरला. लीने हा गेम २१-१७ ने जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)