भारत फेड चषकाच्या प्ले ऑफमध्ये; इंडोनेशियावर २-१ ने केली मात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 03:20 AM2020-03-09T03:20:09+5:302020-03-09T03:20:18+5:30
ऐतिहासिक कामगिरी - आयटीएफ ज्युनिअर सर्किटमध्ये १५ व्या क्रमांकावर असलेल्या नुगरोहोने ऋतुजाला एक तास ४३ मिनिटांत ३-६, ६-०, ३-६ असे पराभूत केले
दुबई : अंकिता रैनाच्या कामगिरीच्या जोरावर भारताने इंडोनेशियावर २-१ ने मात करत प्रथमच फेड चषक टेनिस स्पर्धेच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. अंकिताने शनिवारी अलडिला सुतजियादी हिच्याविरुद्धचा एकेरीचा सामना जिंकत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिला. तत्पूर्वी ऋतुजा भोसलेला नुगरोहोकडून पराभूत व्हावे लागले होते.
आयटीएफ ज्युनिअर सर्किटमध्ये १५ व्या क्रमांकावर असलेल्या नुगरोहोने ऋतुजाला एक तास ४३ मिनिटांत ३-६, ६-०, ३-६ असे पराभूत केले. त्यानंतर अंकिताने दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात सुतजियादीला ६-३, ६-३ असे पराभूत केले. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात अंकिता व सानिया मिर्झाने सुतजियादी व नुगरोहो या जोडीवर ७-६, ६-० असा विजय मिळवत प्ले आॅफमधील आपले स्थान पक्के केले.
प्ले आॅफचा सामना एप्रिलमध्ये होणार असून, लॅटेव्हिया व नेदरलँड यांच्यातील विजेत्याशी भारताला दोन हात करावे लागतील. भारताने सहा संघांच्या ग्रुपमध्ये सलग चार सामने जिंकून दुसरे स्थान मिळविले. सुरुवातीच्या सामन्यात भारताला चीनकडून पराभव पत्करावा लागला होता. चीनने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही.
चार वर्षांनतर फेड चषक स्पर्धेत खेळणाºया सानियामुळे भारताला फायदा झाला. भारताचा बिगर खेळाडू कर्णधार विशाल उत्पल म्हणाला, ‘हा ऐतिहासिक क्षण आहे. मी या संघाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे.’