ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विलगीकरणाचे नियम कडक; पोलिसांची राहणार पाळत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 01:59 AM2021-01-18T01:59:53+5:302021-01-18T07:11:30+5:30
नियमांचे उल्लंघन केले तर कुठली कारवाई होईल, याबाबत सांगण्यात आलेले आहे. जर विलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन झाले तर त्यांना मोठ्या रकमेच्या दंडासह अधिक सुरक्षित विलगीकरण परिसरामध्ये पाठविण्यात येईल.
मेलबर्न :ऑस्ट्रेलियन ओपनसाठी येथे दोन विशेष विमानाने दाखल झालेल्या ४७ खेळाडूंना विलगीकरणात पाठविण्यात आले आहे. कारण त्यापैकी चार व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. स्थानिक स्वास्थ्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व खेळाडूंना यापूर्वी जोखमीची कल्पना देण्यात आलेली आहे.
नियमांचे उल्लंघन केले तर कुठली कारवाई होईल, याबाबत सांगण्यात आलेले आहे. जर विलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन झाले तर त्यांना मोठ्या रकमेच्या दंडासह अधिक सुरक्षित विलगीकरण परिसरामध्ये पाठविण्यात येईल. तेथे त्यांच्या हॉटेलच्या रूमच्या दाराच्या बाहेर पोलीस तैनात राहतील. सध्या काही खेळाडू यामुळे नाराज आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या लोकांसोबत विमानप्रवास केल्यामुळे त्यांना ‘जवळचा संपर्क’ गटात ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांना अन्य खेळाडूंच्या तुलनेत कडक विलगीकरणात राहावे लागणार आहे. अन्य खेळाडूंना आपल्या ररूमबाहेर पडून रोज पाच तास सराव करण्याची परवानगी राहणार आहे. तर जवळच्या संपर्क गटात असलेल्या खेळाडूंना तशी मुभा नाही. ते रूमच्या बाहेर पडू शकणार नाही.
शनिवारी तीन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्याची घोषणा करण्यात आली होती. लॉस एंजिलिसच्या फ्लाइटमधील एक क्रु सदस्य, एक प्रशिक्षक व टीव्ही प्रसारण टीममधील एक सदस्य पॉझिटिव्ह आढळला होता. एक अन्य कोरोना पॉझिटिव्ह अबुधाबीहून आलेल्या विमानातील आहे. तेथे एक प्रशिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत. स्पर्धेच्या आयोजकांनी सांगितले की, लॉस एंजिलिस व अबुधाबी येथून आलेल्या विमानातील एकूण चार व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.
१४ दिवसासाठी हॉटेलमध्ये विलगीकरण
- अधिकाऱ्यांनी सांगितले की, लॉस एंजिलिस येथून आलेल्या विशेष विमानामध्ये कोविड-१९चे तीन रुग्ण आढळले तर अबुधाबी येथून आलेल्या विमानात एक रुग्ण आढळून आला.
- दोन वेळची चॅम्पियन व्हिक्टोरिया अजारेंका व २०१४चा अमेरिकन ओपन उपविजेता केई निशिकोरी लॉस एंजिलिस येथून आलेल्या विमानात होते. त्याआधी, अधिकाऱ्याने सांगितले की, लॉस एंजिलिस येथून आलेल्या सर्व प्रवाश्यांना १४ दिवसांच्या कालावधीसाठी हॉटेलमध्ये कडक विलगीकरणात पाठविण्यात आले आहे.