राफेल नदालने आणखी दोन स्पर्धा जिंकल्या आहेत 11 वेळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 02:08 PM2018-06-11T14:08:21+5:302018-06-11T14:08:21+5:30
स्पेनच्या राफेल नदालने पटकावलेल्या फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या 11 व्या विजेतेपदाच्या विक्रमाची सर्वत्र चर्चा आहे. निश्चितपणे हा असाधारण विक्रम आहे.
- ललित झांबरे
स्पेनच्या राफेल नदालने पटकावलेल्या फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या 11 व्या विजेतेपदाच्या विक्रमाची सर्वत्र चर्चा आहे. निश्चितपणे हा असाधारण विक्रम आहे. मात्र नंबर वन नदालने तब्बल 11 वेळा जिंकलेली ही काही एकच स्पर्धा नाही तर आणखी दोन स्पर्धा त्याने 11-11 वेळा जिंकल्या आहेत. फ्रेंच ओपनप्रमाणेच बार्सिलोना ओपन आणि माँटे कार्लो ओपन स्पर्धेच्या अजिंक्यपदावर 11 वेळा त्याने आपल्या नावाची मोहर उमटवली आहे. याप्रकारे एक-दोन नाही तर तब्बल तीन स्पर्धा प्रत्येकी 11 वेळा जिंकणारा टेनिस इतिहासातील तो एकमेव खेळाडू आहे. योगायोगाने या तिन्ही स्पर्धा क्ले कोर्टवरच्या असल्याने 'क्ले कोर्टचा बादशहा' आपल्याशिवाय दुसरा कुणी असूच शकत नाही हे त्याने सिद्ध केले आहे.
या तिन्ही स्पर्धांठिकाणी योगायोगाने त्याची ही अजिंक्यपदाची मालिका एकाच वर्षी म्हणजे 2005 पासून सुरु झाली आणि गेल्यावर्षी त्याने या तिन्ही स्पर्धांच्या अजिंक्यपदांचे दशक पूर्ण केले तर यंदा 11 व्यांदा विजेतेपदाचा मान मिळवला.
यंदा बार्सिलोना ओपनच्या अंतिम फेरीत त्याने ग्रीसच्या स्टिफानोस त्सित्सीपासला 6-2,6-1 अशी मात दिली. त्यानंतर माँटे कार्लो ओपनच्या विजेतेपदाच्या लढतीत जपानच्या केई निशीकोरीवर तो 6-3, 6-2 असा सरस ठरला आणि रविवारी रोलँड गॕरोसवर ११व्यांदा विजेतेपदाचा चषक उंचावताना त्याने अॉस्ट्रियाच्या डॉमिनीक थिएमचा सरळ सेटमध्ये 6-4, 6-3, 6-2 असा धुव्वा उडवला. 2005ते 08, 2011 व 2012 आणि 2017 व 2018या आठ वर्षी त्याने बार्सिलोना, माँटे कार्लो आणि फ्रेंच ओपन या तिन्ही स्पर्धा जिंकल्या. या काळात 2015 हे एकमेव असे वर्ष ठरले ज्यात त्याने या तीनपैकी एकही स्पर्धा जिंकली नाही.
नदालची प्रत्येकी 11 अजिंक्यपदं
फ्रेंच माँटे कार्लो बार्सिलोना
ओपन ओपन ओपन
२००५ २००५ २००५
२००६ २००६ २००६
२००७ २००७ २००७
२००८ २००८ २००८
- २००९ २००९
२०१० २०१० -
२०११ २०११ २०११
२०१२ २०१२ २०१२
२०१३ - २०१३
२०१४ - -
- २०१६ २०१६
२०१७ २०१७ २०१७
२०१८ २०१८ २०१८