राफेल नदाल एटीपी फायनल्समधून बाद, पुन्हा एकदा जेतेपदाचे स्वप्न भंगले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 05:43 AM2022-11-17T05:43:00+5:302022-11-17T05:43:22+5:30
Rafael Nadal : स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने २२ ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावून टेनिसविश्वात अढळ स्थान प्राप्त केले. मात्र, त्याला कारकिर्दीत कधीही एटीपी फायनल्स स्पर्धा जिंकला आली नाही.
तूरिन (इटली) : स्पेनचा दिग्गज टेनिसपटूराफेल नदाल याने २२ ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावून टेनिसविश्वात अढळ स्थान प्राप्त केले. मात्र, त्याला कारकिर्दीत कधीही एटीपी फायनल्स स्पर्धा जिंकला आली नाही. नदालचे हे स्वप्न यंदाही अपूर्णच राहिले आहे. सलग दोन पराभव पत्करावे लागल्यानंतर राफेलचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
अव्वल मानांकित नदालला मंगळवारी या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळत असलेल्या फेलिक्स एगर एलियासिमे याने ६-३, ६-४ असे नमवले. याआधी, अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झ यानेही नदालला ७-६(७-३), ६-१ असा धक्का दिला होता. सलग दोन पराभवांनंतर नदालची वाटचाल बिकट झाल्यानंतर बुधवारी नॉर्वेच्या तिसऱ्या मानांकित कॅस्पर रुडने फ्रिट्झचा ६-३, ४-६, ७-६(८-६) असा पराभव केला. यासह नदालचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले.
मी टेनिस खेळणे किंवा मानसिकरीत्या मजबूत होणे विसरलोय, असे मला वाटत नाही. मला सर्व सकारात्मक गोष्टींचे स्मरण करून दमदारपणे पुनरागमन करावे लागेल.
- राफेल नदाल
दहावेळा सहभाग, यश एकदाही नाही
या धक्कादायक निकालानंतर यंदाच्या वर्षाच्या अखेरीस एटीपी क्रमवारीत स्पेनच्याच कार्लोस अल्कारेझचे अव्वल स्थान कायम राहणार असल्याचेही स्पष्ट झाले. नदालने आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा सलग चार पराभव पत्करले आहेत.
यंदाच्या सत्राच्या सुरुवातीला नदालने ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
जिंकत विश्वविक्रमी कामगिरी केली होती. मात्र, यानंतर त्याला दुखापतीमुळे विम्बल्डनमधून माघार घ्यावी लागली होती.
नदालने आतापर्यंत एटीपी फायनल्समध्ये दहा वेळा सहभाग घेतला असून, त्याला एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. २०१० आणि २०१३ मध्ये नदालला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.