नदालची यूएस ओपनमधून माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 09:27 AM2021-08-21T09:27:52+5:302021-08-21T09:28:15+5:30
Rafael Nadal : सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओद्वारे नदालने म्हटले की, ‘सर्वांना कळविण्यात दु:ख होत आहे की, मी २०२१ च्या सत्रात टेनिस खेळणे कायम ठेवू शकणार नाही.
माद्रिद : स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने आगामी यूएस ओपनमधून माघार घेतली आहे. त्याचबरोबर त्याने पायाच्या दुखापतीमुळे संपूर्ण सत्रात खेळणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नोव्हाक जोकोविचकडून अनपेक्षित पराभव पत्करावा लागल्यानंतर नदालने विम्बल्डन व टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतली होती.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओद्वारे नदालने म्हटले की, ‘सर्वांना कळविण्यात दु:ख होत आहे की, मी २०२१ च्या सत्रात टेनिस खेळणे कायम ठेवू शकणार नाही. सर्वांना माहीत आहे की, मी पायाच्या दुखण्याने त्रस्त आहे. यामुळे मी अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकलो नाही. गेल्या वर्षी मी पुरेसा सराव करू शकलो नाही आणि त्यामुळेच मला अनेक स्पर्धांमध्ये पूर्ण तयारीविना खेळावे लागले.’