राफेल नदालनं पटकावलं 11वे फ्रेंच ओपनचे जेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 09:42 PM2018-06-10T21:42:08+5:302018-06-11T04:41:31+5:30
फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरी सामन्याच्या अंतिम फेरीत स्पेनच्या राफेल नदालनं ऑस्ट्रियाच्या डॉमनिकला पराभवाची धूळ चारली आहे.
पॅरिस- फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत स्पेनच्या राफेल नदालनं ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थिएमला पराभवाची धूळ चारली आहे. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात नदालनं ऑस्ट्रियाच्या थिएमचा 6-4, 6-3, 6-2 असा धुव्वा उडवला. दोन तास चाललेल्या सामन्यात राफेलनं थिएमला संधीच दिली नाही. राफेलनं या सामन्यातील विजयासह 11 वेळा फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावण्याचा मान मिळवला आहे.
सलग दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन पटकावलेल्या नदालने अकराव्यांदा येथे बाजी मारली असून कारकिर्दीतील एकूण १७ ग्रँडस्लॅम जेतेपदांची नोंद केली. त्याच्याहून जास्त ग्रँडस्लॅम केवळ स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने (२०) पटकावली आहेत. त्याचबरोबर नदालने एकाच ग्रँडस्लॅममध्ये सर्वाधिक जेतेपद पटकावण्याच्या मार्गारेट कोर्टच्या विश्वविक्रमाचीही बरोबरी केली. मार्गारेटने १९६० ते १९७३ या कालावधीमध्ये आॅस्टेÑलियन ओपनमध्ये अशी कामगिरी केली होती. दरम्यान, नदाल आणि थिएम दहाव्यांदा क्ले कोर्टवर आमनेसामने आले होते आणि यात नदालने सातव्यांदा बाजी मारली आहे.
स्पर्धेतील थिएमची वाटचाल पाहता, अंतिम सामना चुरशीचा होण्याची शक्यता होती. मात्र अनुभवी नदालने तुफानी खेळ करताना सामना एकतर्फी केला. दुसºयाच गेममध्ये थिएमची सर्विस भेदत नदालने जेतेपद आपणच पटकावणार असल्याचे स्पष्ट केले आणि झालेही तसेच. यानंतर थिएमने काही चांगले फटके मारत पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, जबरदस्त नियंत्रण मिळवलेल्या नदालपुढे त्याचा निभाव लागला नाही. अखेरच्या सेटमध्ये नदालने ३ चॅम्पियनशीप पॉइंट मिळवले. हे तिन्ही पॉइंट थिएमने वाचवले व सामना अतिरिक्त गेममध्ये नेत लढत रोमांचक नेली. परंतु, यावेळी नदालने जेतेपद अधिक लांबणार नाही याची काळजी घेत थिएमला चूक करण्यास भाग पाडले आणि निर्णायक गुणाची कमाई करत विक्रमी जेतेपदाला गवसणी घातली.
वर्षं | विजेता | उपविजेता |
2005 | राफेल नदाल | मारियानो पुएर्टा |
2006 | राफेल नदाल | रॉजर फेडरर |
2007 | राफेल नदाल | रॉजर फेडरर |
2008 | राफेल नदाल | रॉजर फेडरर |
2010 | राफेल नदाल | रॉबिन सोडरलिंग |
2011 | राफेल नदाल | रॉबिन सोडरलिंग |
2012 | राफेल नदाल | नोवाक जोकोविच |
2013 | राफेल नदाल | डेव्हिड फेरर |
2014 | राफेल नदाल | नोवाक जोकोविच |
2017 | राफेल नदाल | स्टेन वावरिंका |
2018 | राफेल नदाल | डोमिनिक थिएम |
बार्बोरा-कॅटरीना दुहेरीत विजयी
बार्बोरा क्रेजसिकोवा व कॅटरिना सिनियाकोवा या झेक प्रजासत्ताच्या सहाव्या जोडीने दमदार खेळ करताना महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी एरी होजुमी व माकोटो निनोमिया या जपानी जोडीचा यांचा ६-३, ६-३ असा केवळ ६५ मिनिटांत पराभव केला. दरम्यान ग्रँडस्लॅममध्ये जेतेपद पटकावणारी पहिली जपानी जोडी असा विक्रम रचण्यास एरी - माकोटो यांचा प्रयत्न होता. मात्र, बार्बोरा - कॅटरिना यांनी त्यांचे स्वप्न धुळीस मिळवले.