रामानाथन उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 04:14 AM2018-07-21T04:14:43+5:302018-07-21T04:14:50+5:30
भारताच्या रामकुमार रामानाथनने कॅनडाच्या वासेक पोस्पिसिलचा पराभव करीत प्रथमच एटीपी उपांत्य फेरी गाठली तर लिएंडर पेस दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यामुळे न्यूपोर्ट हॉल आॅफ फेम ओपन ग्रासकोर्टमधून बाहेर झाला.
नवी दिल्ली : भारताच्या रामकुमार रामानाथनने कॅनडाच्या वासेक पोस्पिसिलचा पराभव करीत प्रथमच एटीपी उपांत्य फेरी गाठली तर लिएंडर पेस दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यामुळे न्यूपोर्ट हॉल आॅफ फेम ओपन ग्रासकोर्टमधून बाहेर झाला.
चेन्नईच्या २३ वर्षीय रामानाथनने १ तास १८ मिनिट रंगलेल्या लढतीत पोस्पिसिलचा ७-५, ६-२ ने पराभव केला. आता त्याला अमेरिकेच्या टीम स्मिजेकच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. गेल्या वर्षी जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या डोमिनिक थियेमचा पराभव करणाऱ्या रामानाथनने पाच एस लगावले आणि तीन ब्रेक पॉर्इंट मिळवले.
पेस व अमेरिकेचा त्याचा सहकारी जैमी सेरेतानी यांना जीवन नेदुंचेझियान व आॅस्टिन क्राइसेक यांच्याविरुद्ध ६-३, ७-६ ने पराभव स्वीकारावा लागला. आता जीवन व आॅस्टिन यांना स्पेनच्या मार्सेलो अरेवालो व मेक्सिकोच्या मिगुल एंजेल रेयेस वारेला या चौथ्या मानांकित जोडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
दिवीज शरण व त्याचा सहकारी जॅक्सन विथ्रो यांनी आॅस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडेन व युक्रेनचा सर्जेई स्टाखोवस्की यांचा ७-६, ६-३ ने पराभव केला. आता त्यांना पुढच्या फेरीत न्यूझीलंडचा अर्टेम सिटाक व इस्रायलचा जोनाथन एलरिच यांच्यासोबत लढत द्यावी लागेल.
अर्टेम व जोनाथन यांनी भारताचा पूरव राजा व ब्रिटेनचा केन स्कुपस्की यांचा ४-६, ६-३, १०-८ ने पराभव केला. (वृत्तसंस्था)