रॉजर फेडरर आणि सेरेना विलियम्स धडकणार आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 01:46 AM2019-01-01T01:46:37+5:302019-01-01T01:47:16+5:30
नव्या वर्षाची सुरुवात टेनिस विश्वासाठी आश्चर्यकारक अशी असेल जेव्हा टेनिस इतिहासातील दोन दिग्गज आमनेसामने असतील. स्वीत्झर्लंडचा महान खेळाडू रॉजर फेडरर आणि अमेरिकेची सेरेना विलियम्स हे पहिल्यांदाच एकमेकांचा सामना करताना दिसतील.
पर्थ : नव्या वर्षाची सुरुवात टेनिस विश्वासाठी आश्चर्यकारक अशी असेल जेव्हा टेनिस इतिहासातील दोन दिग्गज आमनेसामने असतील. स्वीत्झर्लंडचा महान खेळाडू रॉजर फेडरर आणि अमेरिकेची सेरेना विलियम्स हे पहिल्यांदाच एकमेकांचा सामना करताना दिसतील. हे शक्य होईल ते हॉपमॅन टेनिस चषकात. विद्यमान चॅम्पियन स्वीत्झर्लंडचा मिश्र दुहेरीचा संघ अमेरिकेविरुद्ध भिडणार आहे. पर्थमध्ये होणारा हा हॉपमॅन चषक शेवटचा असेल. असे असले तरी फेडरर आणि सेरना यांच्या सामन्यावरून अनेक जण उत्साहित आहेत. या दोघांना एकमेकांविरुद्ध खेळण्याची कल्पना टेनिस चाहत्यांना सुखावणारी आणि तितकीच उत्सुकतेची आहे. सेरेना आणि फेडरर यांनी दोघांनी मिळून आतापर्यंत ४३ ग्रॅण्डस्लॅम जिंकलेले आहेत. त्यामुळे या दोघांच्या यशाचा आवाका लक्षात येईल.
फेडररने हॉपमॅन चषक स्पर्धेत रविवारी सुरुवातीचा सामना जिंकला. या विजयानंतर तो म्हणाला की, आम्हा दोघांसाठी हा क्षण खूप रोमांचक असेल. मला आशा आहे की हा सामना अधिक टेनिस चाहते पाहतील. सेरेनाने कोर्टवर आणि कोर्टबाहेर जे काही केले त्यावर मी प्रभावित आहे. आम्ही दोघेही कट्टर प्रतिस्पर्धी आहोत. नेहमी जिंकण्याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे हा सामना चांगला होईल. असे पहिल्यांदाच होत आहे आणि पुढेही असेहोईल, याची शक्यता कमी आहे. महिला असो किंवा पुरुष, आमच्या खेळातील ती मोठी प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे तिच्याविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असेल, असेही फेडरर म्हणाला.
दरम्यान, टेनिसमध्ये महिला आणि पुरुष यांच्यातील सामना १९७३ मध्ये खेळविण्यात आला होता. हा प्रदर्शनीय सामना होता. यामध्ये बिली जीन किंगने रिंग्सचा पराभव केला होता.