क्लस्टरविरोधात रहिवाशांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे; कोळीवाडे, गावठाणे यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 12:23 AM2020-11-08T00:23:00+5:302020-11-08T00:23:07+5:30
संस्थेवर कारवाईची मागणी
ठाणे : ठाणे महापालिका राबवत असलेल्या नागरी समूह विकास योजना (क्लस्टर) तयार करण्याकरिता खाजगी संस्थेची नियुक्ती केल्याने त्यात अनेक दोष, त्रुटी असल्याचा दावा हाजुरी गावठाण सामाजिक संस्था व ठाणे शहर गावठाण, कोळीवाडे संवर्धन समितीने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केला आहे. या योजनेबाबत हरकती, सूचनांवर रीतसर सुनावणी झालेली नाही व शासनाची दिशाभूल केली असल्याने संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली. गावठाणे, कोळीवाडे यांना क्लस्टरमधून वगळण्याच्या सरकारने विधिमंडळात दिलेल्या आश्वासनाचा सरकारला विसर पडल्याचेही लक्षात आणून दिले.
हाजुरी गावठाण सामाजिक संस्था व ठाणे शहर गावठाण कोळीवाडे संवर्धन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी नार्वेकर यांची शुक्रवारी भेट घेऊन क्लस्टरच्या कामातील त्रुटी व त्यापासून उद्भवणाऱ्या समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. ठाणे शहर गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समितीचे पदाधिकारी शिरीष साळगावकर म्हणाले की, ही योजना राबवताना महापालिकेने वेळोवेळी नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या. मात्र, त्यांची आजपर्यंत सुनावणी झाली नाही.
हजारो वर्षांपासून असलेले कोळीवाडे, गावठाण, पाड्यांचा गेल्या काही वर्षांत विस्तार झाला आहे. त्यावेळी ठाणे महापालिका अस्तित्वात आली नव्हती. या मुद्यांवर यावेळी चर्चा झाली. कोरोनाच्या काळात मनपाने शासनास खोटी, दिशाभूल करणारी माहिती देऊन या योजनेला मंजुरी प्राप्त करून घेतली, असा आरोप करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
विधान परिषद आणि विधानसभेत याबाबत अनेकदा चर्चा झाली असून क्लस्टर याेजनेतून काेळीवाडे, गावठाणे, पाडे आणि त्यांचे विस्तारित भाग वगळण्यात येतील, असे नमूद करण्यात आलेले आहे. असे असताना महापालिका अधिकारी दिशाभूल करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.