चुकलेल्या नियोजनामुळे नालेसफाईचे तेच रडगाणे
By अजित मांडके | Published: June 24, 2024 06:29 AM2024-06-24T06:29:37+5:302024-06-24T06:29:51+5:30
ठाणे किंवा कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, मीरा भाईंदर येथील शहरांचे नियोजन योग्य पद्धतीने झालेले नाही.
ठाणे महापालिका हद्दीत दरवर्षी चांगल्या पद्धतीने नालेसफाई झाली आहे, असा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी तो फोलपणा आता समोर आला आहे. नालेसफाईचे नियोजन नसणे, चुकलेली नाले बांधणी, अरुंद झालेले नाले, नाल्यांचा बदलेला प्रवाह, नाल्याशेजारी झालेली बांधकामे आणि नागरिकांचा असहकार आणि ठेकेदारांकडून नालेसफाईच्या नावावर केल्या जात असलेल्या हात की सफाईमुळे नालेसफाईचे रडगाणे हे वर्षानुवर्षे सुरूच आहे. हे केवळ ठाण्यातच नाही, तर जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या ठिकाणीही असाच प्रकार असल्याने त्याचा फटका सामान्यांना सहन करावा लागत आहे.
ठाणे किंवा कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, मीरा भाईंदर येथील शहरांचे नियोजन योग्य पद्धतीने झालेले नाही. किंबहुना विकास आराखड्यानुसार ही शहरे वसलेली नाहीत. या शहरांना अनधिकृत बांधकामांचा विळखा पडलेला आहे. त्यातही पालिकेकडून केल्या जात असलेल्या कामांचे अयोग्य पद्धतीने नियोजन, काही निर्धारित मर्जीतील नागरिकांसाठी हव्या त्या पद्धतीने रस्त्यांची बांधणी, नाल्यांची बांधणी केली जात आहे. तसेच एखाद्याला नाल्याचा अडसर ठरत असल्यास त्या नाल्याचा प्रवाह बदलला जात आहे. मात्र, त्यावर पालिका काहीच हरकत घेत नाही. त्याचा फटका मात्र नागरिकांना सहन करावा लागतो.
ठाणे महापालिका हद्दीत ३०८ मोठे, तर १२९ छोट्या नाल्यांचा समावेश आहे. दरवर्षी या नालेसफाईसाठी महापालिका ८ ते १० कोटी खर्च करते. परंतु, वरवरची नालेसफाई करून ठेकेदारही हात की सफाई करीत आहे. त्यातही नालेसफाई योग्य पद्धतीने होत नसल्याचे पालिकेनेदेखील आता मान्य केले आहे. या नाल्यांची बांधणी करताना ती योग्य पद्धतीने झालेली नाही. काही ठिकाणी नाल्यांचा प्रवाह बदलला आहे, तर काही ठिकाणी नाला अरुंद करण्यात आला आहे, घोडबंदर भागात तर हे चित्र हमखास दिसते. या ठिकाणी नवनवीन गृहसंकुले होत असल्याने त्याठिकाणी नाल्यांचा ताप नको म्हणूनच असे प्रकार नित्याचेच झाले आहेत. मात्र, त्याकडे कानाडोळा केला जात आहे. शहरात इतर ठिकाणीही अशाच पद्धतीने नाल्यांची चुकीच्या पद्धतीने बांधणी झालेली आहे. त्यातही सफासफाईच्या बाबतीत महापालिकेचा नियोजनशून्य कारभारही याला तितकाच जबाबदार आहे. मुंब्रा, दिव्याचा विचार केल्यास दिव्यात तर नाल्यांची बांधणी झालेलीच नाही.
उपाययोजना प्रत्यक्षात उतरतील?
आयुक्तांनी यावर उपाय म्हणून नागरिकांशी संवाद साधण्याचे आवाहन प्रभाग स्तरावर सहायक आयुक्तांना दिले आहे त्यांच्याशी संवाद साधून जनजागृती करणे, नाल्यात कचरा टाकण्याऐवजी तोच कचरा घंटागाडीत टाकण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, यासाठी घंटागाड्यांच्या वेळा निश्चित करणे, नाल्यात कचरा पडणार नाही, यासाठी उपाययोजना करणे, आदी उपक्रम हाती घेण्याचे निश्चित केले आहे. मात्र, हे उपक्रम हाती घेतले जातील का? की हवेतच विरतील हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.