Coronavirus : सानिया मिर्झाची समाजोपयोगी चळवळ; रोजंदारी कामगारांचे पोट भरण्याचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 10:45 AM2020-03-25T10:45:01+5:302020-03-25T10:47:29+5:30
देशातील कोरोनामुळे मृतांचा आकडा 10वर पोहोचला आहे आणि पाचशेहून अधिक लोकं पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे
देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री 8 वाजता देशभरात 21 दिवसांची संचारबंदी जाहीर केली. या संचारबंदीच्या काळात रोजंदारीवर पोट असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं पुढाकार घेतला आहे. सानियानं रोजंदारी कामगारांना जेवण आणि मुलभूत गरजेच्या वस्तू पुरवण्याचा निर्धार केला आहे आणि त्यासाठी तिनं एक चळवळ उभी केली आहे.
देशातील कोरोनामुळे मृतांचा आकडा 10वर पोहोचला आहे आणि पाचशेहून अधिक लोकं पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मदतीसाठी सानियानं पुढाकार घेत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
''संपूर्ण जग सध्या आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. आपण नशीबवान आहोत की आपण घरी सुरक्षित आहोत. पण, असे नशीब अनेकांच्या वाट्याला नाही आणि त्यांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. आपापल्या परीनं त्यांना मदत करण्याची हीच वेळ आहे,'' असे सानियानं सांगितले.
ती म्हणाली, साफा आणि अऩ्य काही लोकांसह मी रोजंदारी कामगारांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्धार केला आहे. त्यांना अन्न आणि मुलभूत गरजेच्या वस्तू पुरवणार आहोत.'' या चळवळीत इतरांनीही सहभाग घ्यावा, असे आवाहन सानियानं केले आहे.