पाकिस्तानी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्याला सानिया मिर्झानं दिलं 'हे' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 11:19 PM2018-08-14T23:19:25+5:302018-08-14T23:25:47+5:30
सानियाच्या जबरदस्त उत्तराची ट्विटरवर चर्चा
नवी दिल्ली: टेनिसपटूसानिया मिर्झाला विनाकारण त्रास देणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. 'रोमियो गोल्ड 2.0' नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरुन सानिया मिर्झाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक पाकिस्तानचा असल्यानं रोमियो गोल्ड 2.0 अकाऊंटवरुन मुद्दामहून पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या व्यक्तीला सानियानं जबरदस्त प्रत्युत्तर दिलं.
पाकिस्तानी स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देणाऱ्याला सानियानं सडेतोड उत्तर दिलं. 'माझा आणि माझ्या देशाचा स्वातंत्र्य दिन उद्या आहे. माझे पती आणि त्यांच्या देशाचा स्वातंत्र्य दिन आज आहे. तुम्ही अतिशय संभ्रमात दिसत आहात. तुमचा स्वातंत्र्य दिन कधी आहे?' अशा शब्दांमध्ये सानियानं खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्तीला चोख उत्तर दिलं. सानियाच्या चाहत्यांनीही संबंधित व्यक्तीचा चांगलंच फैलावर घेतलं. यानंतर खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्तीनं रिप्लाय करणंच बंद केलं.
Jee nahi.. mera aur mere country ka Independence Day kal hai, aur mere husband aur unnki country ka aaj!! Hope your confusion is cleared !!Waise aapka kab hai?? Since you seem very confused .. https://t.co/JAmyorH0dV
— Sania Mirza (@MirzaSania) August 14, 2018
सानिया मिर्झानं एप्रिल 2010 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत लग्न केलं. यानंतर सानियाला अनेकदा उलटसुलट प्रश्नांचा सामना करावा लागला. मात्र आपण भारतीय असून कायम भारतीयच राहू आणि भारतासाठीच खेळू, असं सानियानं स्पष्ट केलं. सानिया भारताकडून टेनिस खेळते. जगातील अग्रगण्य खेळाडूंमध्ये गणल्या जाणाऱ्या सानियानं दुहेरीत जबरदस्त कामगिरी केली आहे.