शारीरिक थकव्यामुळे पूर्वीप्रमाणे उत्साहाने खेळणे शक्य नाही! सानिया मिर्झा निवृत्त हाेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 08:50 AM2022-01-20T08:50:52+5:302022-01-20T08:51:37+5:30
३५ वर्षीय सानियाने आपल्या कारकिर्दीत सहा ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावली आहेत.
मेलबर्न : भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा हिने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील महिला दुहेरीत झालेल्या पराभवानंतर आपल्या निवृत्तीची घोषणा केली. ‘२०२२ सालचे सत्र आपले कारकिर्दीतील अखेरचे सत्र असेल,’ असे सांगत सानियाने निवृत्ती जाहीर केली. शारीरिक थकव्यामुळे पूर्वीप्रमाणे उत्साहाने खेळणे शक्य नसल्याचेही सानिया म्हणाली. ३५ वर्षीय सानियाने आपल्या कारकिर्दीत सहा ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावली आहेत.
यामध्ये तीन मिश्र दुहेरी गटाचे जेतेपदांचाही समावेश आहे. भारताची सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू म्हणून सानिया खेळापासून दूर होइल. महिला दुहेरीतील पहिला सामना गमावल्यानंतर सानियाने म्हटले की, ‘माझ्या निवृत्तीच्या निर्णयामागे अनेक कारण आहेत. मला आता सावरण्यास खूप वेळ लागेल याची मला जाणीव आहे. माझा मुलगा सध्या तीन वर्षांचा असून, त्याला सोबत घेऊन इतका प्रवास करणं त्याला संकटात टाकण्यासारखं असल्याचे मला वाटत आहे. दुर्दैवाने कोरोना महामारीमुळे आपल्याला नाईलाजाने स्वत:साठी आणि आपल्या कुटुंबीयांच्या भल्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. शारीरिकदृष्ट्या आता मी कमजोर होत आहे. सामन्यादरम्यान मला गुडघादुखीचा त्रास झाला. यामुळे आम्ही हरलो असे मी म्हणणार नाही. पण आता यातून सावरण्यासाठी मला थोडा वेळ लागत आहे, कारण माझे वय वाढत आहे.’
मी या सत्राचा आनंद घेत आहे. पुनरागमन, तंदुरुस्ती, वजन कमी करण्यासाठी आणि सर्व मातांना एक मार्ग दाखविण्यासाठी मी मेहनत घेतली. बाळाला जन्म दिल्यानंतरही तुम्ही स्वप्नांचा पाठलाग करु शकता हा विश्वास निर्माण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. आता या सत्रानंतर खेळण्यास माझे शरीर साथ देऊ शकेल याची खात्री नाही. - सानिया मिर्झा
पुरस्कार
२००४ साली अर्जुन पुरस्कार
२००६ साली पद्मश्री पुरस्कार
२०१५ साली खेलरत्न पुरस्कार
स्वित्झर्लंडची महान खेळाडू मार्टिना हिंगिससह सानियाची जोडी खूप यशस्वी ठरली होती. सानिया-हिंगीस यांनी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते.
जागतिक एकेरी क्रमवारीत सानियाने अव्वल ३० स्थानांमध्ये झेप घेत कारकिर्दीत सर्वोत्तम २७ वे स्थान मिळवले.