भारतीय टेनिस विश्वाची ‘सोने की चिडीयाँ’, तब्बल दोन दशके बहरली सानियाची कारकीर्द
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 05:56 AM2023-01-29T05:56:56+5:302023-01-29T06:33:37+5:30
Sania Mirza: महिला टेनिसपटूंचा कुठलाही इतिहास नसलेल्या भारतासारख्या देशाला सानियाने मिळवून दिलेले यश सोन्यासारखे होते
- अयाज मेमन
(कन्सल्टिंग एडिटर)
आपल्या देदीप्यमान कारकिर्दीचा शेवट ग्रँडस्लॅम विजयाने करण्यात भारतीय दिग्गज सानिया मिर्झाला अपयश आले. ऑस्ट्रेलियन ओपनमधील मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात सानिया-बोपन्ना या भारतीय जोडीला ब्राझीलच्या राफेल माटोस आणि लुइसा टेफानी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. निश्चितपणे हा पराभव सानियाच्या जिव्हारी लागला असेल. पण म्हणून तिची महानता कमी होत नाही. महिला टेनिसपटूंचा कुठलाही इतिहास नसलेल्या भारतासारख्या देशाला सानियाने मिळवून दिलेले यश सोन्यासारखे होते.
रूढी-परंपरांना भेदण्याचे होते आव्हान
समाजाच्या जुनाट प्रथांना आणि रूढी-परंपरावादी मानसिकतेला भेदणे महिला क्रीडापटूंसमोर मोठे आव्हान असते. अशावेळी कुटुंब, मित्र, प्रायोजक आणि संघटनेकडून महिला खेळाडूंनी जरी समर्थन मिळाले. तरीसुद्धा लोकांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करत खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी दृढनिश्चय असावा लागतो. इतक्या सगळ्या दडपणात काहीच महिला खेळाडू यशस्वी ठरतात. सानिया मिर्झा त्यापैकीच एक. कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक संकटांना तिने तोंड दिले. दुर्दैवाने त्यात मैदानाबाहेरील गोष्टी जास्त होत्या. पण ती थांबली नाही. सतत येणाऱ्या अडथळ्यांना यशस्वीपणे पार केल्यामुळेच ती मोठी कारकीर्द घडवू शकली.
सहा ग्रँडस्लॅम किताब आणि इतर अनेक स्पर्धांचे विजेतेपद सानियाच्या विजिगीषू वृत्तीची, तिच्यात असलेल्या अफाट ऊर्जेची प्रचिती देतात. लिएंडर पेस (१४) आणि महेश भूपती (१२) या भारतीय टेनिसपटूंनी तिच्यापेक्षा जास्त ग्रँडस्लॅम जिंकलेले आहेत. पण या सर्वांपेक्षा सानियाचा संघर्ष मोठा होता. मैदान गाजविण्याआधी मैदानावर पोहोचण्यासाठी तिला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली होती.
यांचाही होता जलवा
संघर्षपूर्ण कारकीर्द घडविणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये सानिया मिर्झा ही काही एकमेव नाही. तिच्या आधीही अनेक महिला खेळाडूंना सामाजिक बेड्या तोडाव्या लागल्या. यामध्ये पी. टी. उषा, मेरी कोम, सायना, सिंधू, ज्वाला गुट्टा, राणी रामपाल, मिताली राज, फोगाट बहिणी, साक्षी मलिक आणि निखत झरीनसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. यातल्या प्रत्येकीचा संघर्ष त्यांच्या दृष्टीने मोठाच होता. दुर्दैम्य आशावादामुळेच या सगळ्या येथवर पोहोचल्या.
ग्लॅमरस व्यक्तिमत्त्वाची धनी असलेल्या सानियाने कुठल्याच गोष्टीचा दिखावा केला नाही. जे होतं ते स्वत:च्या हिमतीवर. त्यामुळे मनाला पटेल त्या गोष्टी सानिया आयुष्यभर करत राहिली. याच गोष्टी तिला टेनिस कारकिर्दीचा उत्कर्ष साधण्यासाठी उपयोगाच्या ठरल्या.