सेरेना, जोकोविच यांची दुसऱ्या फेरीत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 06:40 AM2019-01-16T06:40:44+5:302019-01-16T06:40:52+5:30

ऑस्ट्रेलियन ओपन; सिमोना हालेपची विजयासाठी झुंज

Serena and Djokovic in the second round | सेरेना, जोकोविच यांची दुसऱ्या फेरीत धडक

सेरेना, जोकोविच यांची दुसऱ्या फेरीत धडक

Next

मेलबर्न : अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विलियम्सने आपल्या विक्रमी २४ व्या ग्रँडस्लॅमच्या मोहिमेची आश्वासक सुरुवात करताना ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. त्याच वेळी जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सिमोना हालेपला मात्र विजयासाठी घाम गाळावा लागला. पुरुषांमध्ये स्टार नोवाक जोकोविच आणि युवा अलेक्झांडर झ्वेरेव यांनी आपापल्या सामन्यात बाजी मारत विजयी सुरुवात केली.


एकतर्फी झालेल्या सामन्यात सेरेनाने केवळ ४९ मिनिटांत बाजी मारताना जर्मनीच्या ततायना मारिया हिचा ६-०, ६-२ असा धुव्वा उडवला. याआधी २०१७ साली याच स्पर्धेत सेरेनाने आपले अखेरचे ग्रँडस्लॅम जेतेपद उंचावले होते. दिग्गज मार्गारेट कोर्टच्या २४ ग्रँडस्लॅम जेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी सेरेनाला केवळ एका विजेतेपदाची गरज आहे. त्याच वेळी जागतिक क्रमवारीतील अव्वल सिमोना हालेपला मात्र कडव्या लढतीस सामोरे जावे लागले. तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात झुंजार खेळ करताना हालेपने एस्टोनियाच्या काइया कानेपीचा ६-७(२), ६-४, ६-२ असा पराभव केला. सहाव्या मानांकित युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिने सहज विजय मिळवताना स्वित्झर्लंडच्या व्हिक्टोरिया गोलबिचचे आव्हान ६-१, ६-२ असे संपुष्टात आणले.

व्हिनसची कडवी झुंज
गेल्या वर्षी यूएस ओपन स्पर्धा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केलेल्या जपानच्या नाओमी ओसाका हिनेही सहजपणे विजयी सलामी देताना पोलंडच्या मेग्दा लिनेटला ६-४, ६-२ असे पराभूत केले. अन्य लढतीमध्ये दिग्गज खेळाडू व्हिनस विलियम्सलाही कडव्या लढतीस सामोरे जावे लागले. २५व्या मानांकित रुमानियाच्या मिहेला बुहारनेस्कू हिने व्हिनसला चांगलेच झुंजविले. मात्र आपल्या अनुभवाच्या जोरावर व्हिनसने अखेर ६-७(३), ७-६(३), ६-२ अशी विजयी कामगिरी केली.

झ्वेरेवने मिळवला सहज विजय
जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचने अपेक्षित सुरुवात करताना अमेरिकेच्या मिशेल क्रुगरचा ६-३, ६-२, ६-२ असा सरळ तीन सेटमध्ये फडशा पाडला. कारकिर्दीतील ३००वा ग्रँडस्लॅम सामना खेळलेल्या जोकोविचने एकूण २५९ सामन्यांत विजय मिळवला आहे. त्याचप्रमाणे, चौथ्या मानांकित जर्मनीच्या युवा अलेक्झांडर झ्वेरेव यानेही दुसºया फेरीत धडक मारताना स्लोवेनियाच्या एलजाज बेडेने याचा ६-४, ६-१, ६-४ असा धुव्वा उडवला.

Web Title: Serena and Djokovic in the second round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tennisटेनिस