सेरेना व मारियामध्ये का पेटलंय युद्ध? 13 वर्षांपूर्वीच्या विम्बल्डनमध्ये दडलंय कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 03:00 PM2017-10-17T15:00:11+5:302017-10-17T15:05:59+5:30
मारियाच्या 'अनस्टॉपेबल' या आत्मचरित्राचे प्रकाशनाने 'गडे मुडदे' उखडलेले आहेत आणि आता मारिया शारापोव्हाच्या तिआनजीन ओपनच्या विजेतेपदाने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.
ललित झांबरे
आंतरराष्ट्रीय टेनिस जगतात अलीकडे परस्परविरोधी चित्र बघायला मिळत आहे. पुरुषांमध्ये नंबर वन राफेल नदाल आणि नंबर टू रॉजर फेडरर यांच्यात यशासाठी स्पर्धा असली तरी हेवा वाटावा अशी दोस्ती आहे. लेव्हर कप स्पर्धेत एकाच संघात आणि दुहेरीत सोबत खेळून त्यांनी आपल्या मैत्रीचे दर्शन घडवले. याउलट महिला जगतात मात्र सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोव्हा या मात्र एकमेकावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. मारियाच्या 'अनस्टॉपेबल' या आत्मचरित्राचे प्रकाशनाने 'गडे मुडदे' उखडलेले आहेत आणि आता मारिया शारापोव्हाच्या तिआनजीन ओपनच्या विजेतेपदाने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. वास्तविक गेल्या साधारण दोन वर्षांपासून सेरेना-मारिया सामना झालेला नाही. या काळात दोन्हीही कधीच सक्रीय नव्हत्या. आधी मारिया प्रतिबंधीत द्रव सेवन प्रकरणातील बंदीने दीड वर्ष मैदानाबाहेर होती आणि ती कोर्टवर परतली तर सेरेना बाळंतपणामुळे कोर्टबाहेर बसली आहे. असे असले तरी या दोन यशस्वी टेनिसपटूंमधील आग काही कमी झालेली नाही.
दोन दिवसांपूर्वीच मारियाने तिआनजीन ओपन स्पर्धा जिंकून दीर्घकाळानंतर पहिले अजिंक्यपद पटकावले पण सेरेनाच्या चाहत्यांनी तिचे कौतुक करण्याऐवजी वेगवेगळ्या प्रकारे तिच्यावर टीका केली आहे. तिला खोटारडी, ड्रगबाज, चिटर असे संबोधले आहे. काहींनी तर तिच्या या विजेतेपदाची तुलना सेरेनाची अवघ्या काही महिन्यांची मुलगी अॅलेक्सीस अॉलिम्पियाशी केली आहे. 2017 मध्ये मारियाचे विजेतेपद एक आणि सेरेनाच्या तान्हुलीचे एक (सेरेना गर्भवती असताना यंदा जानेवारीत अॉस्ट्रेलियन ओपन खेळली होती) अशी मारियाला चिडवणारी तुलना करण्यात आली आहे. या दोघींमधील हे असले सख्य (?) का आहे? या कडव्या चढाओढीमागचे कारण काय? या दोघींमध्ये नेमके असे काय घडले ज्यामुळे त्यांचे संबंध मैत्रीचे बनण्याऐवजी शत्रुत्वाचे बनले?
वास्तविक या दोन्ही खेळाडू आपआपल्या अर्थाने आंतरराष्ट्रीय टेनिसमधील सर्वात सफल टेनिसपटूंपैकी एक आहेत. सेरेनाचे खेळांतील यश निर्विवाद आहे. तिची 23 ग्रँड स्लॅम अजिंक्यपदं आणि मारियाविरुध्दची विजयांची 19-2 अशी आघाडी याची साक्ष देतात. मारियाचे मैदानावरील यश (केवळ 5 ग्रँड स्लॅम अजिंक्यपद) सेरेनाच्या तुलनेत बरेच कमी असले तरी पैसे कमावण्याच्या बाबतीत 2016 पर्यंत सेरेना तिची बरोबरी करू शकलेली नव्हती आणि मारियावर एप्रिल 2016 पासून डोपिंगमुळे बंदी आली नसती तर कदाचित अजुनही सेरेना तिच्या कमाईची बरोबरी करु शकली नसती. म्हणजे सेरेना मैदानावर तर मारिया मैदानाबाहेर क्विन आहे. तरीही त्यांच्यातील संबंध सलोख्याचे का नाहीत याचे मूळ 2004 च्या विम्बल्डनमध्ये दडले आहे.
2002 आणि 2003 मध्ये सेरेना जबरदस्त फॉर्मात होती, तिने सेरेना स्लॅम केलेले होते, अशावेळी टेनिस जगत हे सेरेनाला कोण आव्हान देऊ शकते, याच्या शोधात होते. अशावेळी 2004 च्या विम्बल्डन फायनलमध्ये अवघ्या 17 वर्षांच्या मारिया शारापोव्हाने सेरेनाला मात दिली आणि टेनिस जगत मारियाकडे नेक्स्ट क्विन अॉफ टेनिस म्हणून पाहू लागले. या विजयाने मारियाला एकदम प्रकाशझोतात आणले मात्र त्यानंतर जे काही घडले त्यातच या दोघींच्या दुश्मनीचे मूळ दडले आहे.
'अनस्टॉपेबल' मध्ये मारियाने लिहिल्यानुसार 2004 च्या त्या पराभवानंतर लॉकर रुममध्ये मारिया कपडे बदलत होती त्यावेळी दुसरीकडे सेरेना जोराजोराने रडत होती. एका हडकुळ्या मुलीने अनपेक्षितरित्या हरवल्याचे तिच्या पचनी पडले नव्हते. आणि त्यावेळीच तिने एका खेळाडूजवळ ' मी त्या **कडून पुन्हा कधीही हरणार नाही' असे विधान केले जे त्या खेळाडूने नंतर मारियाला येऊन सांगितले. या घडामोडीतच मारिया व सेरेनादरम्यानच्या शत्रुत्वाचे बीज पेरले गेले. त्याचवर्षी पुन्हा वर्षाअखेरच्या स्पर्धेत मारियाने सेरेनाला मात दिली मात्र त्यानंतर आजतागायत सेरेनाने तिला आपल्याविरुध्द जिंकू दिलेले नाही. ओळीने 18 सामन्यात तिने मारियाला मात दिली आहे. याचे कारण सेरेनाच्या मनात ठासून भरलेला मारियाबद्दलचा हा संताप आणि तिची धिप्पाड शरीरयष्टी हे असल्याचे मारियाने म्हटले आहे.
सेरेनाच्या शरीरयष्टीबद्दल मारियाने केलेल्या विधानांनी त्यांच्यातील संबंध अधिकच विकोपाला नेले. मारियाने म्हटलेय, " ती टीव्हीवर दिसते त्यापेक्षा प्रत्यक्षात कितीतरी धिप्पाड अन् मजबूत आहे. तिची मनगटे आणि पाय जाडजूड व दणकट आहेत. त्यामुळे ती अतिशय मजबूत, उंचच उंच आणि समोरच्याला अक्षरशः दाबून टाकणारी वाटते. ती बाई आणि मी मुलगी, ती धिप्पाड आणि मी एवढीशी भासते." मारियाने केलेल्या या डेव्हिड आणि गोलियथसारख्या वर्णनाने सेरेनाला अधिकच नाराज केले. वास्तविक मारिया ही सेरेनापेक्षा चांगली पाच इंच उंच आहे. तरी ती सेरेना मला उंचच उंच भासते असे म्हणते तेंव्हा चिड येणे स्वाभाविकच आहे.
अलीकडेच आपल्या कन्यारत्नाच्या जन्मानंतर आईला लिहिलेल्या एका भावपूर्ण पत्रात सेरेनाने मारियाच्या या टिकेला जबरदस्त उत्तर दिलंय. तिने म्हटलंय, " प्रिय आई, मला माहित आहे जगातील सर्वात कणखर महिलांपैकी तू एक आहेस. मी माझ्या मुलीकडे बघतेय आणि बघ, तिचे हात आणि पाय अगदी माझ्यासारखेच आहेत. अगदी तसेच मजबूत, पीळदार आणि ताकदवान..आणि शरीरसुध्दा तसेच . आता मला 15 वर्षांची असल्यापासून आजतागायत ज्या दिव्यातून जावे लागतेय तशी वेळ तिच्यावर आली तर मी कशी वागेन ते सांगता येत नाही...मी वरवर मजबूत दिसत असल्याने मला पुरुषी समजले गेले. आम्ही ड्रग्ज घेतो अशी शंकासुध्दा उपस्थित केली गेली. (मात्र फायद्यासाठी खोट्याचा आधार घ्यायचा एवढी बेईमानी माझ्यात अद्याप आघाडी लेली नाही). मी महिला टेनिससाठी नाहीच तर पुरुषांमध्ये खेळले पाहिजे असेही म्हटले गेले परंतु आई, तू कृष्णवर्णी महिलेची ताकद समजू न शकणाऱ्या कुणाच्याही मागे मागे फिरली नाहीस आणि आम्ही त्यांना काही महिला कशा असतात हे दाखवू शकलो याचा मला अभिमान आहे. सर्वच सारख्या असू शकत नाही पण आम्ही महिला आहोत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. आई, तू फारच छान आहेस आणि तुझ्यासारखेच मी बनावे असा माझा प्रयत्न आहे. तू आम्हाला दिली तशीच शिकवण आणि तसेच मनोधैर्य अॅलेक्सिस अॉलिंम्पिया देण्याचा प्रयत्न करणार आहे". हे असले भावपूर्ण पत्र लिहून सेरेनाने मारियाला चोख उत्तर दिले आहे.
या दोघींमधील वितुष्टात भर घालणारे तिसरे कारण म्हणजे गिगोर दिमित्रोव्ह नावाच्या खेळाडूशी या दोघींची असलेली दोस्ती. गिगोरची सुरुवातीला सेरेनाशी जवळीक होती पण नंतर तो मारियाच्या जवळ आला. 2013 मधील या दोघींच्या पत्रकार परिषदा या विषयावरुन होणाऱ्या शेरेबाजीने रंगतदार व्हायच्या. पुढे मारियाच्या आयुष्यातूनही हे प्रकरण संपले. याशिवाय मारियाचा एकेकाळचा विवाहित प्रशिक्षक मोराटोग्लूवरुनही मारियाने सेरेनावर काही गंभीर आरोप केले होते.
अशा कारणांनी मारिया व सेरेना यांच्यात सख्य राहिलेले नसल्याचे प्रतिबिंब मारियाच्या 'अनस्टॉपेबल' या आत्मचरित्रातही उमटले आहे. त्यात मारियाने थोडथोडक्या नाही तर शंभरदा सेरेनाचा उल्लेख केला आहे. डोपिंग बंदी उठल्यानंतरही मारियाचे पुनरागमन व तिला दिले जाणारे वाईल्ड कार्डस् याचे ख्रिस एव्हर्ट व मार्टिना नवरातिलोवासारख्या दिग्गजांनी समर्थन केले असले आणि कॕरोलीन वोझ्नियाकी व युजीन बौचार्डसह अनेकांनी विरोध केला असला तरी सेरेनाने मात्र मौनच पसंत केले आहे. तिच्या समर्थकांनी मात्र सातत्याने मारियावर विखारी टिका सुरुच ठेवली आहे. अगदी तिच्या तान्हुलीसोबतही त्यांनी मारियाची तुलना केली आहे.
या साऱ्या प्रकरणात व्यावसायिकरित्या टेनिस चालवणाऱ्या टेनिस स्पर्धा आयोजक आणि प्रायोजकांचा मात्र देखण्या, सौदर्यवान मारियालाच प्राधान्य राहिल्याचे दिसून आले आहे. त्यातूनच तिला विरोध असतानाही वाईल्ड कार्ड देणे, तिचे सामने सातत्याने सेंटर कोर्ट किंवा महत्त्वाच्या कोर्टवर ठेवणे असे प्रकार घडून आले आहेत. आता पुढील वर्षी सेरेना पून्हा मैदानात उतरेल, मारियासुध्दा सक्रिय असेल, तेंव्हा ही स्पर्धा आणखी कसा रंग घेते हे बघणे मनोरंजक करणार आहे.