यूएस ओपनमध्ये स्लोएन स्टिफन्स अजिंक्य, मेडिसन किजचा केला पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 03:16 AM2017-09-10T03:16:53+5:302017-09-11T02:01:32+5:30
न्यूयॉर्क, दि. 10 - अत्यंत एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात धडाकेबाज खेळ केलेल्या स्लोएन स्टीफन्स हिने मेडिसन किजचा अवघ्या एका तासामध्ये धुव्वा उडवत यूएस ओपन महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. अमेरिकन खेळाडूंमध्ये झालेल्या या लढतीत स्टीफन्सने बाजी मारत कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद उंचावले. विशेष म्हणजे डाव्या पायाला झालेल्या दुखापतीनंतर स्टीफन्सने ११ महिन्यांच्या कालावधीनंतर टेनिस कोर्टवर पुनरागमन केले होते.
स्टीफन्सने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठे जेतेपद उंचावताना किजचा ६-३, ६-० असा सहज धुव्वा उडवला. त्याचप्रमाणे, २००२ नंतर पहिल्यांदाच यूएस ओपनची अंतिम लढत अमेरिकन खेळाडूंमध्ये झाली. स्टीफन्सने या वेळी बिगरमानांकित खेळाडू म्हणूनही
छाप पाडली. याआधी २००९ मध्ये किम क्लाइस्टर्सने निवृत्तीनंतर पुनरागमन करताना बिगरमानांकित खेळाडू म्हणून यूएस ओपनचे जेतेपद उंचावले होते.
१५ मानांकित किजचा अंतिम लढतीत अत्यंत निराशाजनक खेळ झाला. विशेष म्हणजे दोघीही कारकिर्दीत पहिल्यांच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत खेळत होते. त्यामुळेच तिच्यावरील दडपण स्पष्ट दिसत होते. स्टीफन्सने स्पर्धेतील धडाका अंतिम सामन्यातही कायम ठेवताना पहिल्या सेटमध्ये दोन गेमची आघाडी घेतल्यानंतर किजने पुनरागमनाचे प्रयत्नच सोडले. पहिला सेट मोठ्या फरकाने गमावल्यानंतर दुसºया सेटमध्ये तिच्याकडून पुनरागमनाची अपेक्षा होती. परंतु, किज स्टीफन्सपुढे एकदाही आव्हान उभे करू शकली नाही आणि स्टीफन्सने अखेरपर्यंत आक्रमक पवित्रा राखताना किजचा सहज धुव्वा उडवला. (वृत्तसंस्था)
स्लोएन पाचवी बिगरमानांकित खेळाडू
१९७६ नंतर पहिल्यांदाच यूएस ओपनमधील उपविजेती खेळाडू अखेरच्या सेटमध्ये एकही गेम जिंकू शकली नाही. याआधी ख्रिस एव्हर्टने अंतिम लढतीत इवोन गुलागोंगला ६-३, ६-० असे नमवले होते.
स्टीफन्सने अंतिम सामन्यात केवळ ६ चुका केल्या, तर किजने तब्बल ३० चुका केल्या.
स्टीफन्सने आपल्या गेल्या १७ सामन्यांतील १५ सामने जिंकले आहेत.
ग्रँडस्लॅम जिंकणारी स्टीफन्स केवळ पाचवी बिगरमानांकित खेळाडू ठरली. याआधी यंदा लात्वियाच्या येलेना ओस्तापेंकोने फ्रेंच ओपन जिंकले.
मी अंतिम लढतीत माझा सर्वोत्तम खेळ केला नाही आणि यामुळे मी निराश आहे. पण स्लोएनने खूप समर्थन केले. जर या लढतीत मला हरायचेच होते, तर स्लोएनकडून पराभव झाल्याचा आनंदच आहे. ती माझ्या आवडत्या व्यक्तींपैकी एक आहे.
- मेडिसन किज