स्पेनचा राफेल नदाल दुसऱ्या फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 04:51 AM2019-08-29T04:51:26+5:302019-08-29T04:51:38+5:30
यूएस ओपन टेनिस : थिएम, स्टीपास यांचा पहिल्याच फेरीत धक्कादायक पराभव
न्यूयॉर्क : स्पेनचा दिग्गज राफेल नदालने जॉन मिलमॅन याचा सरळ सेटमध्ये पराभव करीत यूएस ओपन टेनिसमध्ये शानदार सुरुवातीसह दुसरी फेरी गाठली. दुसरीकडे, पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत अनेक दिग्गजांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. जागतिक क्रमवातीत पहिल्या दहा स्थानांत असलेले चार खेळाडू डोमिनिक थिएम, स्टीफानोस स्टीपास, केरेन खचानोव आणि रॉबर्टो बॅटिस्टा आगूट यांना पराभवाचे तोंड पाहावे लागल्यामुळे नदालच्या अंतिम फेरीचा मार्ग सुकर होताना दिसत आहे.
स्पेनचा दुसरा मानांकित नदालने सुमारे दोन तास रंगलेल्या लढतीत जागतिक क्रमवारीतील ६० व्या स्थानावरील आॅस्ट्रेलियन मिलमॅनला ६-३, ६-२, ६-२ असे पराभूत केले. दोनवेळचा फ्रेंच ओपन उपविजेता थिएम मात्र इटलीचा थॉमस फॅबियानो याच्याकडून ६-४, ३-६, ६-३, ६-२ असा पराभूत झाला.
स्टीपासला चार तास चाललेल्या संघर्षात आंद्रे रुबलेव्हविरुद्ध ६-४, ६-७(५/७), ७-६(९/७), ७-५ असा पराभवाचा सामना करावा लागला. लढतीदरम्यान तो पायाच्या दुखण्याने त्रस्त जाणवला, शिवाय त्याने पंचावर पक्षपातीपणाचा आरोपही केला. रशियाचा नववा मानांकित खचानोव्ह कॅनडाचा वासेक पासपिसिलकडून ६-४, ५-७, ६-४, ३-६ असा पराभूत झाला. कझाखस्तानचा मिखाईल कुकुशकीन याने पाच सेटमधील रोमांचक सामन्यात स्पेनचा दहावा मानांकित आगूट याला ६-३, १-६, ४-६, ६-३, ३-६ असा धक्का दिला.
ओसाका, हालेप विजयी
महिला एकेरीत गत चॅम्पियन नाओमी ओसाका व विम्बल्डन चॅम्पियन सिमोना हालेप यांनी सहज विजय मिळवला. ओसाकाने रशियाची अॅना ब्लिोकोवाचा ६-४, ६-७, ६-२ ने पराभव केला. हालेपने अमेरिकेची निकोल गिब्सला ६-३,३-६,६-२ असे नमविले. १५ वर्षीय कोको गॉफने अमेरिकन ओपन पदार्पणात तीन सेटमध्ये अनास्तासिया पोतापोवा हिचा पराभव केला.