सिमोनाच्या 'नंबर वन' पदावरुन महिला टेनिसमध्ये वादळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 01:19 PM2017-10-31T13:19:59+5:302017-10-31T13:22:07+5:30
कोणतेही ग्रँड स्लॅम स्पर्धा विजेतेपद नावावर नसताना जागतिक क्रमवारीत सर्वोच्च स्थानी पोहचलेल्या आणि वर्षअखेरपर्यंत आपले ‘नंबर वन’ पद सुरक्षित केलेल्या रूमानियाच्या सिमोना हालेपला टेनिस जगतातील काहींनी टिकेचे लक्ष्य केले आहे.
ललित झांबरे
नवी दिल्ली - कोणतेही ग्रँड स्लॅम स्पर्धा विजेतेपद नावावर नसताना जागतिक क्रमवारीत सर्वोच्च स्थानी पोहचलेल्या आणि वर्षअखेरपर्यंत आपले ‘नंबर वन’ पद सुरक्षित केलेल्या रूमानियाच्या सिमोना हालेपला टेनिस जगतातील काहींनी टिकेचे लक्ष्य केले आहे. मात्र रॉजर फेडरर, किम क्लायस्टर्स आणि ख्रिस एव्हर्टसारखे दिग्गज खेळाडू तिच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. वुमेन्स टेनिस असोसिएशनने (डब्ल्यू.टी.ए.) १९७५ मध्ये जागतिक क्रमवारी सुरु केल्यापासून सिमोना ही वर्षाअखेरची 13वी नंबर वन ठरली आहे.
टेनिस जगतात वर्षाच्या अखेरीस नंबर वन असणे फार महत्त्वाचे मानले जाते. असा बहुमान मिळवणारी ती पहिलीची रुमानियन महिला टेनिसपटू आहे. काय आहे आक्षेप ? सिमोनाच्या टिकाकारांचा मुख्य आक्षेप हा आहे की अद्याप तिच्या नावावर एकही ग्रँड स्लॅम विजेतेपद नाही. यंदा वर्षभरात तिने केवळ एकच स्पर्धा (माद्रिद) जिंकली आणि फ्रेंच ओपनसह चार स्पर्धामध्ये ती उपविजेती राहिली.
वर्षाआखेरच्या सिंगापूर डब्ल्युटीए फायनल्समध्ये तर ती एकही सामना जिंकू शकली नाही. तरीही जस्टीन ओस्टापेंको, गर्बाइन मुगुरूझा, स्लोन स्टिफन्स या यंदाच्या ग्रँड स्लॅम विजेत्या आणि कॅरोलिन वोझ्नियाकी या डब्ल्यूटीए फायनल विजेतीपेक्षा ती वरच्या स्थानी आहे. यामुळे डब्ल्यूटीएच्या गुणप्रणालीतच कुठेतरी दोष आहे असे जाणकार म्हणतात.
पुरुषांमध्ये केवळ दोनच ग्रँड स्लॅमलेस नंबर वन -
यासाठी पुरूषांच्या टूरचा (एटीपी) दाखला देण्यात येतो. एटीपी टूरमध्ये आतापर्यंत केवळ इव्हान लेंडल व मार्सेलो रियोस हे दोनच खेळाडू स्लॅम विजेतेपदाआधी नंबर वन ठरले होते. यापैकी लेंडलने नंतर ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या परंतु डब्ल्यूटीए टूरमध्ये मात्र अशा सात खेळाडू स्लॅमलेस असताना नंबर वन पदावर पोहचल्या आहेत. त्यांच्यात सिमोनाशिवाय किम क्लायस्टर्स, अॅमेली मॉरेस्मो, येलेना यांकोविच, दिनारा साफिना, कॅरोलिना प्लिस्कोव्हा आणि कॅरोलीन वोझ्नियाकी यांचा समावेश आहे. आणि ग्रँड स्लॅम विजेतेपदाशिवाय वर्षअखेर नंबर वन राहिलेल्यांमध्ये मार्टिना हिंगिस (2000), डेव्हेनपोर्ट (2001, 04, 05), यांकोवीच (2008) आणि वोझ्नियाकी (2010, 11) यांचा समावेश आहे.
सेरेनाच्या विश्रांतीने केली उलथापालथ -
खरं म्हणजे यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपननंतर सेरेना विल्यम्सच्या बाळंतपणाच्या विश्रांतीमुळे महिला टेनिसच्या नंबर वन पदासाठी इतरांना दारे उघडी झाली. त्याचा फायदा घेत यंदा सेरेनानंतर अँजेलीक कर्बर, मुगुरूझा, प्लिस्कोव्हा आणि हालेप अशा आणखी चार खेळाडू वर्षभरात आपण नंबर वन पदावर पोहचलेल्या पाहिल्या. सिंगापूरच्या डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेचे विजेतेपद प्लिस्कोव्हाने पटकावले असते तर ती वर्षअखेर नंबर वन राहिली असती, परंतु वोझ्नियाकीने उपांत्य फेरीत केलेल्या तिच्या पराभवाने ती शक्यता मावळली. एरवीसुद्धा प्लिस्कोव्हा नंबर वन राहिली असती तर तिच्या नावावरसुद्धा स्लॅम विजेतेपद नाही. त्यामुळे तीसुद्धा टीकाकारांचे लक्ष्य ठरली असती.
क्लायस्टर्सवरही झाली होती टिका
यासंदर्भात सिमोना, प्लिस्कोव्हा व वोझ्नियाकी यांच्याप्रमाणेच स्लॅम विजेतेपदाशिवाय नंबर वनवर पोहचलेली किम क्लायस्टर्सने म्हटले आहे की, बालपणापासूनच माझे नंबर वन बनण्याचे स्वप्न होते. ते साकारलेही परंतु माध्यमांमध्ये या संदर्भात होणाऱ्या नकारात्मक चर्चेला सामोरे जाणे फार कठीण असते. मी तर अशी काही टीका होऊ शकते याचा विचारसुद्धा केलेला नव्हता. माझ्यासाठी नंबर वन बनणे हेच महत्त्वाचे होते. आता सिमोना, प्लिस्कोव्हा व वोझ्नियाकी यांनासुद्धा अशाच नकारात्मक प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे परंतु त्या आपआपल्या परीने सर्वोंत्तम खेळ करीत आहेत.
स्लॅमपेक्षा सातत्य महत्त्वाचे- एव्हर्ट
दिग्गज ख्रिस एव्हर्ट यांनीसुद्धा स्लॅमशिवाय नंबर वन पद मिळण्यात काहीच गैर नसल्याचे म्हणत सिमोनाचे जोरदार समर्थन केले आहे. त्या म्हणतात की एखादेच ग्रॅँड स्लॅम विजेतेपद जिंकल्यावर नंतर साधारण खेळ करत राहण्यापेक्षा वर्षाच्या १२ महिने सातत्याने चांगली कामगिरी करत राहणे केंव्हाही चांगले! अशी भूमिका मांडतांनाच त्यांनी ५ फुट ६ इंच उंचीच्या सिमोना हिने स्पर्धक महिला खेळाडूंपेक्षा साधारण अर्धा फुट कमी उंची असूनही मिळवलेले हे नंबर वन पद कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे. बुटक्या खेळाडूला अधिक ताकदीने आणि अधिक धावपळ करत खेळावे लागते अशी यामागची कारणमिमांसा त्यांनी केली आहे.
श्रेय हिरावू नका, सन्मान करा- फेडरर
पुरूषांमध्ये सध्या नंबर दोन असलेला आणि दीर्घकाळ नंबर वन पद भुषविलेल्या रॉजर फेडररनेही स्लॅम विजेतेपदाशिवाय नंबर वन पदावर पोहचणाऱ्यांवरची टिका अनाठायी असल्याचे म्हटले आहे. फेडरर म्हणतो, ‘नंबर वन पदावर पोहचलेली प्रत्येक व्यक्ती त्या सन्मानाला लायकच असते. आयुष्यभराचे हे स्वप्न साकारण्यासाठी प्रचंड मेहनत केलेल्या हालेप किंवा आणखी कुणाचेही श्रेय तुम्ही एक सेकंदासाठीसुद्धा हिरावून घेवू शकत नाही. तिने वर्षभर संघर्ष केलाय, तिने संधी मिळवल्या आणि त्या साधत ती नंबर वन वर पोहचली आहे. त्यामुळे तिला योग्य मानसन्मान द्यायलाच हवा. मी पूर्वीसुद्धा सांगितलेय की केवळ स्लॅम स्पर्धाच नाही तर पूर्ण वर्षभरात ती चांगली खेळ करत आलीय आणि त्याचे फळ तिला मिळायलाच हवे. ती काही स्पर्धा जिंकली, काही हरली परंतु सातत्याने चांगला खेळ करणे महत्त्वाचे आहे आणि तो तिने केलाय. उलट माझ्या मते तर ग्रँड स्लॅममध्ये तर बऱ्याच प्रमाणात उधळपणे गुण दिले जातात. त्यामुळे ग्रॅँड स्लॅम स्पर्धा न जिंकता नंबर वन पदावर पोहचणे अधिक कठीण आहे.’
सहभागाच्या गुणांवर प्रश्न -
हे समर्थन करतानाच फेडररने महिला टेनिसच्या एका चुकीकडेही लक्ष वेधले आहे. त्याच्या मते डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेत केवळ सहभागासाठीही महिला खेळाडूंना गुण मिळतात. पुरुषांच्या एटीपी टूरमध्ये असे नाही. हे काहीसे विचित्र वाटते परंतु डब्ल्यूटीए फायनल्ससाठी पात्र ठरणेच कठीण असल्याने ते हे गुण देत असावेत असे त्याने म्हटले आहे.
सर्वेक्षण दिग्गजांच्या मताविरोधात
या दिग्गजांनी समर्थन केले असले तरी डब्ल्यूटीएने घेतलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणातही स्लॅम विजेतेपदाशिवाय नंबर वनला पसंती मिळालेली नाही. या सर्वेक्षणात नंबर वन खेळाडू स्लॅम विजेता असावा असे मानणारे ५३ टक्के लोक असल्याचे दिसून आलेले आहे.
डब्ल्यूटीएच्या विद्यमान टॉप फाईव्ह
१- सिमोना हालेप
२- गर्बाईन मुगुरुझा
३- कॅरोलीन वोझ्नियाकी
४- कॅरोलिना प्लिस्कोवा
५- व्हिनस विल्यम्स
आत्तापर्यंतच्या वर्षाअखेरच्या नंबर वन महिला टेनिसपटू
1) ख्रिस एव्हर्ट- पाच वेळा (1975, 76, 77, 80, 81)
2) मार्टिना नवरातिलोवा- सात वेळा (1978, 79, 82, 83, 84, 85, 86)
3) स्टेफी ग्राफ- आठ वेळा ( 1987, 88, 89, 90, 93, 94, 95(संयुक्त), 96)
4) मोनिका सेलेस - तीन वेळा (1991, 92, 95 (संयुक्त))
5) मार्टिना हिंगिस - तीन वेळा (1997, 99, 2000)
6) लिंडसे डेव्हेनपोर्ट - चार वेळा (1998, 2001, 04, 05)
7) सेरेना विल्यम्स - पाच वेळा ( 2002, 09, 13, 14, 15)
8) जस्टीन हेनीन- तीन वेळा ( 2003, 06, 07)
9) येलेना यांकोवीच- एकदा (2008)
10) वोझ्नियाकी- दोन वेळा (2010, 11)
11) व्हिक्टोरिया अझारेंका- एकदा (2012)
12) अँजेलिक कर्बर- एकदा (2016)
13) सिमोना हालेप- एकदा (2017)