सानिया मिर्झाचे यशस्वी पुनरागमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 03:58 IST2020-01-19T03:58:22+5:302020-01-19T03:58:38+5:30
होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सानियाने शनिवारी युक्रेनची साथीदार नादिया किचनोकच्या साथीने दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

सानिया मिर्झाचे यशस्वी पुनरागमन
होबार्ट : मुलाचे संगोपन करण्यासाठी जवळपास दोन वर्षे टेनिसपासून दूर राहिल्यानंतर सानिया मिर्झाने दणक्यात पुनरागमन केले. होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सानियाने शनिवारी युक्रेनची साथीदार नादिया किचनोकच्या साथीने दुहेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सानिया-नादिया जोडीने चीनच्या शुई पेंग आणि शुई झँग जोडीचा ६-४, ६-४ ने पराभव केला.
सानिया- नादिया यांनी पहिल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंची सर्व्हिस मोडित काढून वर्चस्व गाजवले. या दोघींना नवव्या गेममध्ये ब्रेक पॉईंट मिळाला. यानंतर पहिला सेट त्यांनी सहज जिंकला.
चीनच्या जोडीला दुसऱ्या सेटच्या सुरुवातीला खेळ जमला नाही. त्यांनी तिस-या गेममध्ये सर्व्हिस गमावली. सानिया-नादिया यांनी सहाव्या गेममध्ये बाजी मारताच आघाडी ४-२ अशी झाली होती. चीनच्या खेळाडूंचा देखील संघर्ष सुरूच होता. आठव्या गेममध्ये ब्रेक पॉईंट होताच ४-४ अशी बरोबरी झाली. सानिया- नादिया यांनी नवव्या गेममध्ये सर्व्हिसचा बचाव करीत सामना खेचून नेला.