स्विस स्टार रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत, रॉबिन हासे याच्याशी होणार लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 06:03 AM2018-02-17T06:03:56+5:302018-02-17T06:04:16+5:30
स्विस स्टार रॉजर फेडररने जर्मनीच्या फिलीप कोलश्रेबर याचा ७-६, ७-५ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ हॉलंडच्या रॉबिन हासे याच्याशी पडणार आहे.
रॉटरडम : स्विस स्टार रॉजर फेडररने जर्मनीच्या फिलीप कोलश्रेबर याचा ७-६, ७-५ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ हॉलंडच्या रॉबिन हासे याच्याशी पडणार आहे.
द्वितीय मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हने सर्बियाच्या फिलिप क्राजिनोविच याचा ७-६, ७-५ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. आता या बल्गेरियाच्या खेळाडूचा सामना आंद्रे रुबलेव्ह याच्याशी होईल. रुबलेव्ह याने जवळपास २ तास चाललेल्या लढतीत दामीर जुमहूर याचा ६-४, ७-६ असा पराभव केला. रशियन खेळाडू दानिल मेदवेदेव याने फ्रान्सच्या पियरे हुगुएस हर्बट याच्यावर ३-६, ७-६, ६-४ असा विजय मिळवताना अंतिम आठमध्ये प्रवेश मिळवला. फेडरर गेल्यावर्षी जानेवारीत विश्व रँकिंगमध्ये १७ व्या स्थानावर होता; परंतु त्यानंतर त्याने जोरदार मुसंडी मारत आॅस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले होते.
- २0 ग्रँडस्लॅम जिंकणारा फेडरर जर उपांत्य फेरीत विजय मिळवू शकल्यास तो टेनिस रँकिंगमध्ये आपला जुना प्रतिस्पर्धी आणि जवळचा मित्र राफेल नदालला मागे टाकण्यात यशस्वी ठरेल. त्याचप्रमाणे हा स्विस खेळाडू विश्व रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनू शकतो. अशी कामगिरी केल्यास तो आंद्रे अगासीला मागे टाकू शकतो. अगासी २00३ मध्ये ३३ वर्षे आणि १३१ दिवसांचा असताना अव्वल रँकिंगवर पोहोचला होता.