Rafael Nadal: टेनिसचा बापमाणूस खऱ्या आयुष्यात पहिल्यांदाच 'बाप' बनला; राफेल नदालला पूत्ररत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 11:56 IST2022-10-09T11:56:14+5:302022-10-09T11:56:42+5:30
राफेलला मुलगा झाल्याचे वृत्त स्पेनच्या सर्वच महत्वाच्या प्रसार माध्यमांनी दिले असले तरी राफेलच्या जनसंपर्क कार्यालयाने यावर काही माहिती देण्यास नकार दिला आहे.

Rafael Nadal: टेनिसचा बापमाणूस खऱ्या आयुष्यात पहिल्यांदाच 'बाप' बनला; राफेल नदालला पूत्ररत्न
अवघ्या टेनिसविश्वाला आपल्या कवेत घेणारा स्पॅनिश टेनिसपटू राफेल नदाल पहिल्यांदाच बाप बनला आहे. नदालची पत्नी मारिया फ्रांसिस्का पेरेलो ने मुलाला जन्म दिला आहे. राफेल हा सर्वाधिक २२ ग्रँडस्लॅम जिंकणारा खेळाडू आहे.
नदालच्या बाप बनण्याचा केवळ टेनिस विश्वालाची नाही तर फुटबॉल विश्वाला देखील आनंद झाला आहे. स्पेनचा प्रसिद्ध फुटबॉल क्लब रिअल माद्रिदने आपल्या ट्विटर अकाऊंटवर राफेलला शुभेच्छा दिल्या आहेत. आमच्या प्रिय मानद सदस्य राफेल नदाल आणि मारिया पेरेलो यांना त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्माबद्दल अभिनंदन. या क्षणाचा आनंद वाटून घेण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. हार्दिक शुभेच्छा, असे रिअल माद्रिदने म्हटले आहे.
राफेलला मुलगा झाल्याचे वृत्त स्पेनच्या सर्वच महत्वाच्या प्रसार माध्यमांनी दिले असले तरी राफेलच्या जनसंपर्क कार्यालयाने यावर काही माहिती देण्यास नकार दिला आहे. राफेलच्या खासगी बाबींवर काही बोलणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राफेल नदाल आणि मारिया यांचे तीन वर्षांपूर्वी ऑक्टोबर 2019 मध्ये लग्न झाले होते. त्यात फक्त जवळच्या लोकांनाच आमंत्रित करण्यात आले होते. त्याआधी जानेवारीमध्ये दोघांनी एंगेजमेंटची घोषणा केली होती. नदाल आणि मारिया 2005 पासून एकमेकांना डेट करत होते.