भारतीय टेनिसमध्ये ठोस व्यवस्था नाही- सुमित नागल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 07:35 AM2020-09-03T07:35:34+5:302020-09-03T07:35:39+5:30
आपले अनेक खेळाडू या खेळामध्ये सातत्याने खेळत आहे, आपल्याकडे गुणवत्ता आहे.
न्यूयॉर्क : ‘टेनिसमधील इतिहास पाहता भारताने या खेळामध्ये याहून अधिक चांगली कामगिरी करायला पाहीजे होती. मात्र भारतीय टेनिसमध्ये ठोस व्यवस्थेचा अभाव आहे,’ अशी प्रतिक्रिया देत यूएस ओपनमध्ये पहिला सामना जिंकून ऐतिहासिक कामगिरी केलेल्या सुमित नागलने भारतीय टेनिस व्यवस्थेवर टीका केली.
२३ वर्षीय नागल म्हणाला की, ‘या शानदार विजयाने मी नक्कीच आनंदी आहे, मात्र दुसरी बाजू बघितल्यास आपण याहून अधिक चांगली कामगिरी करु शकलो असतो. आपले अनेक खेळाडू या खेळामध्ये सातत्याने खेळत आहे, आपल्याकडे गुणवत्ता आहे. परंतु, कोणती व्यवस्था नाही आणि याचे मला दु:ख होते.’
आपल्या कामगिरीविषयी नागल म्हणाला की, ‘या स्पर्धेतील पहिल्या फेरीत मिळवलेला विजय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी येथे खेळण्याचा आनंद घेतोय. या सामन्यातील संभाव्य विजेता असल्याची जाणीव असतानाही कोर्टवर जाणे सोपे नव्हते. मी काहीसा नर्व्हस होतो आणि ग्रँडस्लॅममधील माझ्या पहिल्या विजयासाठी खेळत होतो. मी संयम कायम राखला आणि माझा नैसर्गिक खेळ केला.’ (वृत्तसंस्था)
>सुमित नागलचा क्लानवर विजय
सुमित नागल युएस ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत अमेरिकेच्या ब्रॅडली क्लानला पराभूत करत गेल्या सात वर्षांमध्ये ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत एकेरीत सामन्यात विजय मिळवणारा पहिला भारतीय बनला आहे. दुसऱ्या फेरीत त्याचा सामना तिसºया स्थानावर असलेल्या डॉमिनिक थिएमसोबत होईल. मंगळवारी रात्री उशिरा दोन तास १२ मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-१,६-३, ३-६,६-१ असे पराभूत केले. क्लान हा विश्व रँकिंगमध्ये फक्त एका स्थानाने पुढे आहे. या आधी देखील २०१३ मध्ये सोमदेव देववर्मन हा कोणत्याही ग्रॅण्डस्लॅममध्ये एकेरीत विजय मिळवणारा अखेरचा भारतीय होता. याआधी २०१३ मध्ये भारताच्या सोमदेव देववर्मन याने यूएस ओपनमध्येच स्लोवाकियाच्या लुकास लैको याला नमवून विजयी सलामी दिली होती. २०१७ साली सोमदेवने निवृत्ती घेतली. मात्र त्याने २०१३ साली ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि यूएस ओपनच्या दुसºया फेरीत धडक मारली होती.