US open: १९ वर्षीय कोको गॉफ ठरली अमेरिकन ओपनची नवी चॅम्पियन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 09:31 AM2023-09-11T09:31:51+5:302023-09-11T09:32:11+5:30
US open: पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केलेल्या अमेरिकेच्या १९ वर्षीय कोको गॉफने कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जिंकताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
न्यूयॉर्क : पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केलेल्या अमेरिकेच्या १९ वर्षीय कोको गॉफने कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जिंकताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तिने तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात बेलारुसच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या एरिना सबालेंकाला पराभवाचा धक्का दिला.
या शानदार विजयासह कोको ही दिग्गज सेरेना विलियम्सनंतरची ही स्पर्धा जिंकणारी पहिली किशोरवयीन महिला खेळाडू ठरली. सेरेनाने १९९९ मध्ये वयाच्या १७व्या वर्षी ही स्पर्धा पहिल्यांदा जिंकली होती. कोकोने खराब सुरुवातीनंतर कमालीचे पुनरागमन केले. तिने अखेरच्या दोन सेटमध्ये सबालेंकाकडून झालेल्या चुकांचा फायदा घेत २-६, ६-३, ६-२ असा जबरदस्त विजय मिळवला. या पराभवानंतरही सबालेंका जागतिक क्रमवारीत
प्रगती करेल.
डब्ल्यूटीए क्रमवारीत सबालेंका पोलंडच्या इगा स्वीयातेकला मागे टाकत अव्वलस्थानी कब्जा करेल. तसेच, कोको कारकिर्दीत सर्वोत्तम तिसऱ्या स्थानी पोहोचेल. महिला एकेरीतील या अंतिम सामन्यासाठी अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची उपस्थिती यावेळी लक्षवेधी ठरली.
मी अत्यंत खूश असून, आता पूर्णपणे निश्चिंतही झाली आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर मी यावेळी इतरांसाठी नाही; पण स्वत:साठी जिंकू इच्छित होती. हे जेतेपद माझ्यासाठी विशेष आहे. हीच कामगिरी कायम राखण्याचा माझा प्रयत्न असेल.
- कोको गॉफ
जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान निश्चित झाल्याने यूएस ओपन जेतेपद हुकल्याचे दु:ख कमी झाले आहे. मी नक्कीच अग्रस्थानाचा आनंद साजरा करेन. कोर्टवर माझ्याकडून अनेक चुका झाल्या. मी सामन्यादरम्यान अतिविचार करत खेळली.
- एरिना सबालेंका