यूएस ओपन : डोमिनिक थीम चॅम्पियन, दोन सेट गमावल्यानंतर ७१ वर्षात सर्वात शानदार विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 12:33 AM2020-09-15T00:33:14+5:302020-09-15T06:44:27+5:30
थीमने अलेक्झांडर झ्वेरेववर २-६, ४-६, ६-४, ६-३, ७-६ (८/६) अशी मात केली.
न्यूयॉर्क : आॅस्ट्रियाच्या डोमिनिक थीमने पहिले दोन सेट गमावल्यानंतरही पाचव्या सेटच्या टायब्रेकमध्ये अलेक्झांडर झ्वेरेवचा पराभव करीत अमेरिकन ओपनमध्ये पुरुष एकेरीत जेतेपदाचा मान मिळवला. थीमने अलेक्झांडर झ्वेरेववर २-६, ४-६, ६-४, ६-३, ७-६ (८/६) अशी मात केली.
स्पर्धेच्या इतिहासात ७१ वर्षांत फायनलमध्ये पहिले दोन सेट गमावल्यानंतर एखाद्या खेळाडूने विजेतेपद मिळवले आहे. याआधी अशी कामगिरी १९४९ मध्ये पांचो गोंजालेजने केली होती. थीमचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. थीम यापूर्वी तीनदा ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पराभूत झालेला आहे. त्यात त्याला फेडरर व राफेल नदालविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्याला फ्रेंच ओपन २०१८ व २०१९ मध्ये अंतिम फेरीत नदालविरुद्ध आणि यंदा फेब्रुवारीमध्ये आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत जोकोविचविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. सामन्यात प्रेक्षकांचा जल्लोष नव्हता किंवा जोरदार ओरडण्याचा आवाजही नव्हता. बाहेरच्या विमानाचा, टेÑन्स, कार इंजिन्स, हॉर्न आणि सायरनचे आवाज मात्र येत होते. (वृत्तसंस्था)
यापूर्वी १९४९ मध्ये टेड श्रोडेरचा पराभव करीत पांचो गोंजालेसने जेतेपद पटकावले होते. त्यावेळी त्यानेही दोन सेटने पिछाडीवर पडल्यानंतर पुनरागमन केले होते. पाचव्या सेटमध्ये टायब्रेक यापूर्वी नोव्हाक जोकोविच व रॉजर फेडरर यांच्यादरम्यान २०१९ च्या विम्बल्डन फायनलमध्ये खेळला गेला होता. त्यावेळी जोकोविचने जेतेपद पटकावले होते.
‘कदाचित आज दोन विजेते असायला हवे होते. आम्ही दोघेही याचे हकदार आहोत.’
- डोमिनिक थीम