यूएस ओपन - सलग दुस-या सामन्यात फेडररचा झुंजार विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 03:39 AM2017-09-02T03:39:49+5:302017-09-02T03:40:05+5:30

दिग्गज टेनिसस्टार रॉजर फेडरर याने यूएस ओपन स्पर्धेच्या अंतिम ३२ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले असले, तरी त्याला सलग दुस-या सामन्यात तब्बल ५ सेटपर्यंत झुंजावे लागले.

US Open - Federer wins the second consecutive match | यूएस ओपन - सलग दुस-या सामन्यात फेडररचा झुंजार विजय

यूएस ओपन - सलग दुस-या सामन्यात फेडररचा झुंजार विजय

Next

न्यूयॉर्क : दिग्गज टेनिसस्टार रॉजर फेडरर याने यूएस ओपन स्पर्धेच्या अंतिम ३२ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले असले, तरी त्याला सलग दुस-या सामन्यात तब्बल ५ सेटपर्यंत झुंजावे लागले. सलामीच्या सामन्यात अमेरिकेचा १९ वर्षीय बिगरमानांकीत फ्रान्सिस टायफो याच्याविरुद्ध झुंजावे लागलेल्या फेडररला दुस-या सामन्यात रशियाच्या मिखाईल यूझनी याने कडवी लढत दिली. त्याव्यतिरिक्त अग्रमानांकीत राफेल नदालने आपला विजयी धडाका कायम राखला. तसेच, महिला गटात अनपेक्षित निकालांची मालिका कायम राहिली.
फेडररला सलग दुसºया सामन्यात घाम गाळावा लागला. ३ तास ७ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या लढतीत फेडररने मिखाईलचे कडवे आव्हान ६-१, ६-७(३-७), ४-६, ६-४, ६-२ असे परतावले. पहिला सेट सहज जिंकून अपेक्षित सुरुवात केलेल्या फेडररने यानंतरचे दोन सेट गमावले. परंतु, पुढील दोन सेटमध्ये त्याने जबरदस्त पुनरागमन करताना मिखाईलला आपला हिसका दाखवला. यासह यूएस ओपनमध्ये त्याने ८०वा विजय नोंदवला.
दुसरीकडे, अग्रमानांकीत नदालने अपेक्षित आगेकूच करताना जपानच्या तारो डॅनियलला ४-६, ६-३, ६-२, ६-२ असे नमवले. तारोने पहिला सेट जिंकून नदालला धोक्याचा इशारा दिला. मात्र, यानंतर नदालने आपला उच्च दर्जाचा खेळ करत सलग तीन सेटमध्ये एकतर्फी वर्चस्व राखताना विजयी आगेकूच केली. त्याचवेळी, सातव्या मानांकीत बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोवचे आव्हान संपुष्टात आले आहे. युवा खेळाडू आंद्रे रुबलेव याने शानदार खेळ करताना दिमित्रोवला ७-५, ७-६, ६-३ असा धक्का दिला. अर्जेंटिनाच्या २४व्या मानांकीत जुआन मार्टिन डेल पेत्रोनेही विजयी आगेकूच करताना स्पेनच्या अ‍ॅड्रियन मेनेंडेज मसेइरास याला ७-६, ६-३, ७-६ असे नमवले.
महिला गटामध्ये अमेरिकेची शेल्बी रॉजर्स आणि आॅस्टेÑलियाची २५वी मानांकीत डारिया गावरिलोवा यांच्यातील लढत सुमारे साडेतीन तास रंगली. महिला टेनिसमधील सर्वात लांबलचक ठरलेल्या या सामन्यात रॉजर्सने ७-६, ४-६, ७-६ असा अनपेक्षित विजय मिळवला. रशियाच्या आठव्या मानांकीत स्वेतलाना कुझनेत्सोवाला जपानच्या कुरुमी नाराविरुद्ध ३-६, ६-३, ३-६ असा पराभव पत्करावा लागल्याने स्पर्धेबाहेर पडावे लागले. (वृतसंस्था)

बोपन्ना, सानियाची विजयी सलामी
रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झा या भारताच्या स्टार खेळाडूंनी दुहेरी गटातील आपआपल्या सामन्यात बाजी मारुन विजयी सलामी दिली. पुरुष दुहेरी गटात बोपन्नाने उरुग्वेच्या पाब्लो कूवाससह खेळताना ब्राडले क्लान - स्काट लिपस्की या अमेरिकी जोडीचा १-६, ६-३, ६-४ असा झुंजार पराभव केला. पहिला सेट गमावून पिछाडिवर पडल्यानंतर बोपन्ना - पाब्लो यांनी शानदार पुनरागमन करत सामना फिरवला. दुसरीकडे महिलांच्या गटात सानियाने चीनच्या शुआइ पेंगसह पहिल्या सामन्यात विजय मिळवताना पेत्रा मात्रिच - डोन्ना वेकिच या क्रिएशियाच्या जोडिला ६-४, ६-१ असे नमवले.
 

Web Title: US Open - Federer wins the second consecutive match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.