सेरेनाचे विक्रमी ग्रँडस्लॅम स्वप्न पुन्हा भंगले!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 07:55 PM2019-09-08T19:55:01+5:302019-09-08T19:56:24+5:30
२३ ग्रँडस्लॅम वेजेतेपद पटकावलेल्या सेरेनाला संभाव्य विजेती मानले जात होते.
न्यूयॉर्क : संपूर्ण टेनिसविश्वाचे लक्ष ज्या विश्वविक्रमी क्षणाकडे लागले होते तो क्षण अखेर पुन्हा एकदा लांबला. अमेरिकेची दिग्गज खेळाडू सेरेना विलियम्सला यूएस ओपन स्पर्धेत अनपेक्षितपणे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्याने तिला मार्गारेट कोर्टच्या विश्विविक्रमी २४ जेतेपदांची बरोबरी करण्यासाठी पुढच्या वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. कॅनडाच्या १९ वर्षीय युवा टेनिसपटू बियांका आंद्रिस्कू हिने कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम उंचावताना दिग्गज सेरेनला धक्का देण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे आंद्रिस्कू कॅनडाची पहिली एकेरी ग्रँडस्लॅम चॅम्पियन ठरली.
२३ ग्रँडस्लॅम वेजेतेपद पटकावलेल्या सेरेनाला संभाव्य विजेती मानले जात होते. किंबहुना तिचे २४वे जेतेपद जवळपास निश्चित मानले गेले होते, मात्र आंद्रिस्कूने दिग्गज सेरेनाच्या तगड्या आव्हानाचे कोणतेही दडपण न घेताना ६-३, ७-५ असा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवत बाजी मारली. यासह आंद्रिस्कू गेल्या १५ वर्षांतील सर्वात युवा खेळाडू ठरली. याआधी रशियाच्या स्वेतलाना कुझनेत्सोवाने वयाच्या १९व्या वर्षीच यूएस ओपनचे जेतेपद पटकावले होते.
दुसरीकडे, सेरेनाला सलग चौथ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. तसेच सलग दुसºया वर्षी सेरेनाला यूएस ओपनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यामुळे तिच्या विक्रमी २४व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाची उत्सुकता आणखी लांबली. यंदाच्या सत्रात आंद्रिस्कू जबरदस्त फॉर्ममध्ये असून ती आतापर्यंत अव्वल १० रँकिंगमध्ये असलेल्या ८ खेळाडूंविरुद्ध खेळली असून या सर्व लढतीत तिने बाजी मारली आहे. या शानदार जेतेपदासह आंद्रेस्कू जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी झेप घेईल.
सेरेनाने आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद १९९९ साली जिंकले होते. दखल घेण्याची बाब म्हणजे त्यावेळी बियांका आंद्रिस्कूचा जन्मही झाला नव्हता.
मला बियांका खूप आवडते, ती खूप चांगली मुलगी आहे. पण हा माझा स्पर्धेतील सर्वात वाईट खेळ होता. मी याहून अधिक चांगली खेळू शकली असती. बियांकाने शानदार खेळ करत मला दबावाखाली ठेवले. या स्तरावर माझे असे प्रदर्शन अत्यंत निराशाजनक आहे. २३ ग्रँडलॅम विजेत्या सेरेनाप्रमाणे आज मी नाही खेळली.
- सेरेना विलियम्स
गेल्या वर्षी मी स्पर्धेला पात्रही ठरु शकली नव्हती आणि नंतर दुखापतीमुळे मी घरी बसलेली. पण हे जीवनाचे चक्र आहे. नेहमीच वाईट किंवा चांगली वेळ राहत नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला सातत्याने मेहनत करावी लागते. सेरेनाविरुद्ध अंतिम सामना खेळणे अद्भुत होते. हे माझे खूप जुने स्वप्न होते आणि मला हे स्वप्न पूर्ण होण्याचा विश्वास होता.
- बियांका आंद्रिस्कू