US Open: रॉजर फेडररने पुन्हा पहिला सेट गमावल्यानंतर मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 12:11 AM2019-08-30T00:11:23+5:302019-08-30T00:12:05+5:30
खांदेदुखीवर मात करीत जोकोविचची कूच
न्यूयॉर्क : गत चॅम्पियन सर्बियाचा नोवाक जोकोविच याने खांद्याचे दुखणे आणि पावसाचा व्यत्यय दूर सारून यूएस ओपन टेनिसच्या तिसऱ्या फेरीत धडक दिली आहे. दुसरीकडे पुन्हा एकदा पहिला सेट गमविल्यानंतरही सावध खेळ करीत रॉजर फेडररने विजयी कूच केली.
अव्वल मानांकित जोकोविचने अर्जेंटिनाचा ५६ वा मानांकित जुआन इग्नासियो याच्यावर ६-४, ७-६, ६-१ ने मात केली. जोकोविचला आता सहकारी दुसान लाजोविच आणि अमेरिकेचा डेनिस कुडला यांच्यातील विजेत्याविरुद्ध खेळावे लागेल.
स्वित्झर्लंडचा दिग्गज फेडररला २००८ नंतर प्रथमच यूएस ओपनचे जेतेपद पटकविण्याची आशा आहे. ९९ व्या क्रमवारीतील खेळाडू बोस्नियाचा दामिर जुमहूर याचा फेडररने ३-६, ६-२, ६-३,६-४ असा पराभव केला. सलामीला फेडररने भारताचा युवा खेळाडू सुमित नागलविरुद्ध पहिला सेट गमावला होता. यानंतर पुन्हा एकदा त्याने पहिला सेट गमविल्यानंतर मुसंडी मारली, हे विशेष. (वृत्तसंस्था)
महिला गटात सेरेना विलियम्सने ‘वाईल्ड कार्ड’ने प्रवेश करणारी १७ वर्षांची कॅटी मॅकेन्लीचा ५-७, ६-३, ६-१ असा पराभव केला. फ्रेंच ओपन विजेती अश्ले बार्टी हिने अमेरिकेची लॉरेन डेव्हिस हिच्यावर ६-२,७-६ ने मात केली. पहिल्या ग्रॅण्डस्लॅमच्या शोधात असलेली झेक प्रजासत्ताकची तिसरी मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवाने जॉर्जियाची नवखी खेळाडू मरियम बोल्कवाद्जेचा ६-१, ६-४ ने पराभव केला. युक्रेनची पाचवी मानांकित एलिना स्वितलोवाने दिग्गज व्हीनस विलियम्सवर ६-४, ६-४ असा सरळ सेटमध्ये विजय नोंदविला. पावसामुळे एकेरीचे ३२ पैकी केवळ १० सामने झाले.