यूएस ओपन टेनिस; रोहन बोपन्नाचा पराभव, मिश्र दुहेरीत निराशा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 05:56 AM2024-09-05T05:56:33+5:302024-09-05T05:57:12+5:30
US Open Tennis 2024: भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपन्ना याला इंडोनेशियाच्या अल्दिया सुत्जियादी हिच्यासोबत मिश्र दुहेरीत खेळताना यूएस ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.
न्यूयॉर्क - भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपन्ना याला इंडोनेशियाच्या अल्दिया सुत्जियादी हिच्यासोबत मिश्र दुहेरीत खेळताना यूएस ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.
डोनाल्ड यंग-टेलर टाउनसेंड या अमेरिकन जोडीने बोपन्ना-अल्दिया यांना ६-३, ६-४ असे नमवले. याआधी, बोपन्ना पुरुष दुहेरीतही पराभूत झाला होता. त्याच्या पराभवानंतर भारताचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.
सबालेंकाची उपांत्य फेरीत धडक
महिला एकेरीत बेलारुसच्या आर्यना सबालेंकाने उपांत्य फेरीत धडक मारताना चीनच्या झेंग क्विनवेन हिचा ६-१, ६-२ असा धुव्वा उडवला. या सामन्यासाठी माजी दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याची उपस्थिती विशेष ठरली. अमेरिकेच्या एम्मा नवारोने आपली स्वप्नवत घोडदौड कायम राखताना आपल्याच देशाच्या पाउला बडोसाचा ६-२, ७-५ असा पराभव केला. यासह नवारोने पहिल्यांदाच कोणत्याही ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठली.
पुरुषांमध्ये अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झने धक्कादायक निकाल नोंदवताना जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याचा ७-६(७-२), ३-६, ६-४, ७-६(७-३) असा पराभव केला. अन्य सामन्यात बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोवने दुखापतीमुळे माघार घेतल्याने अमेरिकेच्या फ्रान्सेस टियाफोची उपांत्य फेरीत कूच झाली. दिमित्रोवने माघार घेतली तेव्हा टियाफो ६-३, ६-७(५-७), ६-२, ४-१ असा आघाडीवर होता.