यूएस ओपन टेनिस: सेरेनाची विजयी सलामी, हालेपचा धक्कादायक पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 09:24 AM2022-08-31T09:24:27+5:302022-08-31T09:24:57+5:30
US Open Tennis: कारकिर्दीतली शेवटची स्पर्धा खेळत असलेल्या सेरेना विलियम्सने माॅंटेनिग्रोच्या दांका कोविनिचचा पराभव करत विजयी सलामी दिली. तर जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या सिमोना हालेप हिला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला.
न्यूयॉर्क : कारकिर्दीतली शेवटची स्पर्धा खेळत असलेल्या सेरेना विलियम्सने माॅंटेनिग्रोच्या दांका कोविनिचचा पराभव करत विजयी सलामी दिली. तर जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या सिमोना हालेप हिला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला.
गतविजेता आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला रशियाचा दानिल मेदवेदेव याच्यासह ब्रिटनच्या अँडी मरे यांनी आपापल्या सामन्यात बाजी मारताना यूएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत विजयी सलामी दिली. मेदवेदेवने अपेक्षित विजयी सुरुवात करताना अमेरिकेच्या स्टीफन कोजलोव याचा ६-२, ६-४, ६-० असा धुव्वा उडवला. दुसऱ्या फेरीत मेदवेदेव आता फ्रान्सच्या आर्थर रिंडरनेशविरुद्ध खेळेल. ब्रिटनचा स्टार टेनिसपटू अँडी मरे यानेही तीन सेटमध्ये विजय मिळवताना अर्जेंटिनाच्या फ्रान्सिस्को कारुनडोलो याचा ७-५, ६-३, ६-३ असा पराभव केला. पुरुषांमध्ये चौथ्या मानांकित स्टेफानोस सिटसिपासच्या पराभवाने खळबळ माजली. पात्रता फेरीत आगेकूच केलेल्या डेनियल इलाही गलान याने ६-०, ६-१, ३-६, ७-५ असा जबरदस्त विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधले.
दिग्गज सेरेना विलियम्सने विजयी सलामी देताना दांका कोविनिचचा ६-३, ६-३ असा फडशा पाडला. सेरेना आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळत आहे.विशेष म्हणजे वयाच्या १७ वर्षी सेरेनाने १९९९ मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकली होती.
ऑलिम्पियाने केली आईसारखी स्टाइल
सेरेनाने १९९९ साली पहिल्यांदाच यूएस ओपन जेतेपद पटकावले होते, तेव्हा तिने केसांमध्ये मोती लावले होते. आता ४० वर्षीय सेरेना आपली अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळत असून या लढतीदरम्यान सेरेनाची मुलगी ‘ऑलिम्पिया’ हिने लक्ष वेधले. कारण ऑलिम्पिया आईप्रमाणेच केसांमध्ये मोती लावून स्टेडियममध्ये उपस्थित राहिली होती.