यूएस ओपन :व्हीनस पराभूत! सानिया-पेंग उपांत्य फेरीत तर स्टीफन्स-मेडिसनमध्ये रंगणार अंतिम लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 12:39 AM2017-09-09T00:39:13+5:302017-09-09T00:39:28+5:30
अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू व्हिनस विलियम्स हिला यूएस ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. अमेरिकेच्याच स्लोएने स्टीफन्स हिने चुरशीच्या सामन्यात व्हिनसला पराभवाचा धक्का दिला.
न्यूयॉर्क: अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू व्हिनस विलियम्स हिला यूएस ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. अमेरिकेच्याच स्लोएने स्टीफन्स हिने चुरशीच्या सामन्यात व्हिनसला पराभवाचा धक्का दिला. तीन महिन्यांआधी गंभीर दुखापतग्रस्त झालेली स्टीफन्स आणि मेडिसन कीस यांच्यात यूएस ओपन टेनिस स्पर्धेत यंदा महिला गटाचा अंतिम सामना खेळला जाईल. विषेष म्हणजे दोघींचा हा पहिलाच अंतिम सामना असेल.
डाव्या पायाला दुखापत झाल्याने तब्बल ११ महिने कोर्टपासून दूर राहिलेल्या स्टीफन्सने सातवेळेची चॅम्पियन व्हीनस विलियम्सला ६-१, ०-६, ७-५ असे पराभूत केले. अमेरिकेचीच १५ वी मानांकित मेडिसन कीस ही मनगटाच्या शस्त्रक्रियेनंतर दहा महिन्यांनी कोर्टवर परतली. तिने आपलीच सहकारी २० वी मानांकित कोको वांडेवेगे हिच्यावर ६-१, ६-२ असा विजय नोंदवित अंतिम फेरीत धडक दिली. यूएस ओपनच्या अंतिम फेरीत दोन्ही स्थानिक खेळाडू खेळण्याची १५ वर्षांत ही पहिली वेळ आहे. याआधी २००२ मध्ये सेरेना विलियम्सने व्हीनसला नमविले होते. स्टीफन्स आणि कीस या जीवलग मैत्रिणी आहेत. फेडरेशन चषकाच्या संघात त्या सोबतच खेळतात. स्टीफन्स म्हणाली, ‘आमच्यात जीवाभावाचे नाते आहे. दीर्घकाळ सोबत असताना मैत्रिणीविरुद्ध खेळणे सोपे जाणार नाही.’ दोघींमध्ये आतापर्यंत एकमेव लढत मियामी येथे २०१५ ला झाली. त्यात स्टीफन्सने बाजी मारली होती.
सानिया-पेंग उपांत्य फेरीत-
भारतीय स्टार सानिया मिर्झा महिला दुहेरी गटाच्या उपांत्य फेरीत दाखल झाली आहे. तिने चीनच्या शुआई पेंगसोबत खेळताना उपांत्यपूर्व सामन्यात टिमिया बाबोस- आंद्रिया लावास्कोवा यांचा ७-६,६-४ असा पराभव केला. आॅस्ट्रेलियन आणि विम्बल्डन स्पर्धेच्या तिसºया फेरीत बाहेर पडलेल्या सानियाची यंदा ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. सानिया- पेंग यांचा उपांत्यफेरीत सामना आता मार्टिना हिंगिस- युंग जान चान यांच्याविरुद्ध होईल. सानियाने मागच्यावर्षी आठ जेतेपद पटकविले त्यापैकी पाच जेतेपद मार्टिना हिंगिससोबत होते. वर्षाअखेर दुहेरी रँकिंगमध्ये सानिया अव्वल स्थानावर होती पण हिंगिसपासून विभक्त होताच वारंवार जोडीदार बदलल्याने सानिया नवव्या स्थानावर घसरली.
कीस म्हणाली...
‘मी सध्या वेगळ्याच फॉर्ममध्ये आहे. कोर्टवर पुनरागमन झाल्याने उत्साहात भर पडली. फायनलमध्ये स्टीफन्सविरुद्ध खेळायला मिळेल याचाही आनंद वाटतो. सध्या स्टीफन्स विश्व क्रमवारीत ८३ व्या स्थानी असली तरी पुढील आठवड्यात ती पहिल्या २५ खेळाडूंमध्ये स्थान मिळवू शकते.’