शारापोवाचा उडाला धुव्वा; मुगुरुझाने केवळ ७० मिनिटांत मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:07 AM2018-06-07T00:07:14+5:302018-06-07T00:07:14+5:30
स्पेनच्या गर्बाइन मुगुरुझा हिने धमाकेदार विजयाची नोंद करताना स्टार खेळाडू रशियाच्या मारिया शारापोवा हिचा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवला. या दिमाखदार विजयासह मुगुरुझाने फ्रेंच ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली.
पॅरिस : स्पेनच्या गर्बाइन मुगुरुझा हिने धमाकेदार विजयाची नोंद करताना स्टार खेळाडू रशियाच्या मारिया शारापोवा हिचा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवला. या दिमाखदार विजयासह मुगुरुझाने फ्रेंच ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. अन्य लढतीत जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू रुमानियाच्या सिमोना हालेपने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना जर्मनीच्या अँजोलिका कर्बर हिचे कडवे आव्हान परतावत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उपांत्यपूर्व सामन्याच्या काही मिनिटांअगओदर दुखापतीमुळे सेरेना विलियम्सनने शारापोवाविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतल्यानंतर यावेळी शारापोवाला मोठ्या कालावधीनंतर ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याची संधी होती. मात्र, मुगुरुझाविरुद्ध ती आव्हानही निर्माण करु शकली नाही. मुगुरुझाने कमालीचे वर्चस्व राखताना केवळ ७० मिनिटांमध्ये बाजी मारत शारापोवाचा ६-२, ६-१ असा फडशा पाडला. मुगुरुझाचे वर्चस्व इतके जबरदस्त होते की, शारापोवाला सामन्यातील पहिला गेम जिंकण्यासाठी २९ मिनिटांपर्यंत प्रतीक्षा करावी लागली आणि येथेच सामन्याचे चित्र स्पष्ट झाले. शारापोवाला मुगुरुझाविरुद्ध एकही ब्रेक पॉइंट मिळवता आला नाही. यामुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या शारापोवाकडून अनेक चुकाही झाल्या आणि त्याचा अचूक फायदा घेत मुगुरुझाने दणदणीत विजयासह आगेकूच केली. अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी मुगुरुझाला बलाढ्य हालेपच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
त्याचबरोबर या पराभवासह कर्बरला एक अनोखा विक्रम नोंदवण्याची संधीही गमवावी लागली. जर कर्बरने हालेपविरुद्ध बाजी मारली असती, तर ती १९९९ नंतर स्टेफी ग्राफनंतरची फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारणारी पहिली जर्मन खेळाडू ठरली असती.
दुसरीकडे अव्वल खेळाडू हालेपने अटीतटीच्या झालेल्या लढतीत पिछाडीवर पडल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केले आणि तुल्यबळ प्रतिस्पर्धी कर्बरचे कडवे आव्हान ६-७(२-७), ६-३, ६-२ असे परतावले. २ तास १४ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यातील पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकून कर्बरने चांगली सुरुवात करत हालेपवर दडपण आणले. परंतु, यानंतर जबरदस्त पुनरागमन केलेल्या हालेपने वेगवान खेळाच्या जोरावर कर्बरला पुनरागमनाची संधी दिली नाही. (वृत्तसंस्था)
हालेप संधी साधणार का?
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सिमोना हालेपला अजूनही आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाची प्रतीक्षा आहे. याआधी २०१४ आणि २०१७ साली तिने फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. पण जेतेपदाला गवसणी घालण्यात तिला अपयश आले होते. आता, अंतिम फेरीसाठी तिला गर्बाइन मुगुरुझाच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. विशेष म्हणजे हालेपने तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली आहे. परंतु, मुगुरुझाने ज्याप्रकारे स्टार शारापोवाला लोळवले ते पाहता हालेपला विजय मिळवण्यासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागेल.