फेडररला कोण म्हणाले, 'एकदातरी आम्हाला जिंकू द्या!'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 02:37 PM2019-01-06T14:37:26+5:302019-01-06T14:38:36+5:30
... आणि उपस्थितांना हसू आवरत नव्हते.
ललित झांबरे : " तुम्हाला बघून बघून आम्ही थकलोय, पण आम्ही काय करु शकतो! विशेषतः तुम्हाला (फेडररकडे अंगुलीनिर्देश करत), तुम्ही तिशीचे काहीतरी आहात. तरीही का? पण का?"
हॉपमन कप टेनिस स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात जर्मनीचा अॅलेक्झांडर झ्वेरेव्ह बोलत होता आणि उपस्थितांना हसू आवरत नव्हते. सलग दुसऱ्या वर्षी जर्मन संघाला नमवत फेडररच्या स्वीस संघाने हॉपमन कप चौथ्यांदा जिंकल्यावर बक्षीस वितरण समारंभावेळी हे नाट्य बघायला मिळाले.
झ्वेरेवचा हा कौतुकपर नाटकी संताप साहजिक होता कारण सलग दुसऱ्या वर्षी त्याला आणि जर्मन संघालाच नमवत फेडररने जर्मनीची हॉपमन कप जिंकण्याची संधी हुकवली होती आणि एरवीसुध्दा २० ग्रँड स्लॅम जेतेपदं नावावर असलेला हा खेळाडू ३७ वर्षे वयातही बहुतेक प्रमुख स्पर्धांत अॅलेक्झांडरसारख्या नव्या खेळाडूंचे आव्हान संपवत आलाय. त्यामुळे फेडरर, नदाल, जोकोवीच हेच खेळाडू जिंकत राहणार असतील तर आम्ही जिंकायचे केंव्हा, अशा अर्थाने अॅलेक्झांडर झ्वेरेवची उमटलेली ही प्रतिक्रिया होती.
किमान एक, फक्त हॉपमन कप, एकदातरी आम्हाला जिंकू द्या, अशी गमतीशीर विनंतीही त्याने फेडररला केली.
या साऱ्या प्रकारावेळी फेडररने शांत राहण्याचा आणि चेहरा निर्विकार ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण प्रयत्न करुनही त्याला आपले हसू रोखता आले नाही. तो म्हणाला की, मी हॉपमन कपच्या विक्रमी यशाने आनंदीत आहे पण मी विक्रमांसाठी येथे खेळलो नाही. हा संपूर्ण आठवडाच भन्नाट राहिला. खूप मजा आली. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायचा मला अभिमान आहे आणि बेलिंडासोबत टीम छान जमलीये.