Wimbledon 2018: थरथराट... जोकोव्हिचचा नदालवर 'जिगरबाज' विजय, अंतिम फेरीत धडक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 08:04 PM2018-07-14T20:04:08+5:302018-07-14T20:27:02+5:30

राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच समोरासमोर आले आणि त्या लढतीत रोमांच नसेल तर कसे चालेल. पाच सेटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात जोकोव्हिचने 6-4, 3-6, 7-6(11-9), 3-6, 10-8 असा विजय मिळवला. जवळपास सव्वापाच तास हा सामना चालला.

Wimbledon 2018: Djokovic victory over Nadal, in the final | Wimbledon 2018: थरथराट... जोकोव्हिचचा नदालवर 'जिगरबाज' विजय, अंतिम फेरीत धडक 

Wimbledon 2018: थरथराट... जोकोव्हिचचा नदालवर 'जिगरबाज' विजय, अंतिम फेरीत धडक 

Next

लंडन - राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच समोरासमोर आले आणि त्या लढतीत रोमांच नसेल तर कसे चालेल. पाच सेटपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात जोकोव्हिचने 6-4, 3-6, 7-6(11-9), 3-6, 10-8 असा विजय मिळवला. जवळपास सव्वापाच तास हा सामना चालला.



दुखापतीमुळे दोन वर्ष जेतेपद पटकावू न शकलेल्या जोकोव्हिचला हा दुष्काळ संपविण्याची संधी आहे. 2016 मध्ये त्याने फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावले होते आणि त्यानंतर त्याला अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही. 2015 नंतर तो प्रथमच विम्बल्डनच्या अंतिम फेरीत खेळणार आहे.


केव्हीन अँडरसन आणि जॉन इस्नर यांच्यातील उपांत्य फेरीतील सामना लांबल्याने नदाल-जोकोव्हिच यांच्यातील अर्धवट राहिलेला सामना शनिवारी खेळवण्यात आला. शुक्रवारी खेळ थांबला त्यावेळी जोकोव्हिचकडे 2-1 अशी आघाडी होती आणि शनिवारी तो सहज विजय मिळवेल अशी अपेक्षा होती. मात्र, चिवट नदालने चौथ्या सेटमध्ये जोरदार मुसंडी मारली. 
प्रचंड चुरशीच्या आणि उत्कंठा वाढवणा-या चौथ्या सेटमध्ये नदालने तीन वेळा विम्बल्डन चषक उंचावणा-या जोकोव्हिचला घाम गाळण्यास भाग पाडले. जोकोव्हिचला प्रत्येक गुणासाठी नदालने संघर्ष करायला लावला. नदालने 1-2 अशा पिछाडीवरून 2-2 अशी बरोबरी मिळवली. त्यामुळे पाचव्या सेटची उत्सुकता अधिक वाढली. 



पाचव्या सेटमध्ये जोकोव्हिचने पहिला गेम घेत अडव्हांटेज घेतला. पण, नदाल हार मानण्यास तयार नव्हता. त्याने आपली सर्व ताकद पणाला लावताना सेटमध्ये  4-4 अशी बरोबरी घेतली. जोकोव्हिच थोडा थकलेला दिसत होता, परंतु तोही हार मानण्यास तयार नव्हता. प्रेक्षकांच्या कौतुकाचा स्वीकार करत दोघेही तोडीसतोड खेळत होते. 


पाचव्या सेटमधील 15व्या गेममध्ये नदालला जोकोव्हिची सर्व्हिस ब्रेक करण्याची संधी होती, परंतु जोकोव्हिचने त्याला संधी साधू दिली नाही. गेमच्या आकडेवारीत नदाल आणि जोकोव्हिच यांच्यात रंगलेली हा विक्रमी सामना ठरला. 


 

Web Title: Wimbledon 2018: Djokovic victory over Nadal, in the final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.