Wimbledon 2018: 3 कोटी डॉलर्सच्या करारानंतर 'असा' बदलला फेडरर, चाहते चकित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:11 AM2018-07-03T00:11:50+5:302018-07-03T00:12:11+5:30
विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या नवव्या जेतेपदासाठी प्रयत्नशील असलेल्या रॉजर फेडररने सोमवारी पहिल्याच फेरीत सहज विजय मिळवला. मात्र या लढतीत त्याच्या टी-शर्टवरील बदललेल्या प्रायोजकाच्या लोगोने प्रेक्षकांचे लक्ष वेधले.
विम्बल्डन -विम्बल्डनटेनिस स्पर्धेच्या नवव्या जेतेपदासाठी प्रयत्नशील असलेल्या रॉजर फेडररने सोमवारी पहिल्याच फेरीत सहज विजय मिळवला. मात्र या लढतीत त्याच्या टी-शर्टवरील बदललेल्या प्रायोजकाच्या लोगोने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. फेडररने नायकेसह दीर्घ काऴ असलेला करार संपुष्टात आणला. त्याच्या टी-शर्टवर युनिक्यूलो या नव्या प्रायोजकाचा लोगो पाहायला मिळाला. नायकेने राफेल नदालसह सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोव्हा या अव्वल खेळाडूंशी करार केलेला आहे.
अनेक खेळाडू तंदुरूस्तीशी झगडत असताना फेडररला विम्बल्डनच्या जेतेपदाचा दावेदार मानले जात आहे. या स्पर्धेतील त्याच्या वर्चस्वाला अद्याप कुणीही धक्का पोहचवू शकलेला नाही. त्याचे सेंटर कोर्टवर आगमन होताच चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. गतविजेत्या फेडररने यावेळी नायके एवजी युनिक्यूलोचा लोगो असलेला पोशाख परिधान केला होता. फेडररने नायकेशी असलेला करार संपुष्टात आणला आहे. स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेडररने नव्या प्रायोजकाशी वर्षाला 3 कोटी डॉलर्सचा करार केला असून नायकेपेक्षा ही रक्कम 2 कोटींहून अधिक आहे.
फेडररने सलामीच्या लढतीत सर्बियाच्या ड्युसान लॅजोव्हीकचा 6-1, 6-3, 6-4 असा पराभव केला.
Another day, yet another milestone.@rogerfederer's victory over Dusan Lajovic was his 103rd #Wimbledon singles match - the most played by any man at The Championships 👏 pic.twitter.com/hwlfwe3STq
— Wimbledon (@Wimbledon) July 2, 2018