Wimbledon Final 2023 : २० वर्षीय कार्लोस अलकराझ दी ग्रेट नोव्हाक जोकोव्हिचवर भारी पडला, जिंकली विम्बल्डन फायनल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 11:25 PM2023-07-16T23:25:18+5:302023-07-16T23:25:35+5:30
Wimbledon Final 2023 : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या कार्लोस अलकराझने सर्वाधिक ग्रँड स्लॅम नावावर असलेल्या दी ग्रेट नोव्हाक जोकोव्हिचला नमवले.
Wimbledon Final 2023 : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या कार्लोस अलकराझने सर्वाधिक ग्रँड स्लॅम नावावर असलेल्या दी ग्रेट नोव्हाक जोकोव्हिचला ( Novak Djokovic) विम्बल्डन फायनलमध्ये कडवी टक्कर दिली. १-२ अशा पिछाडीवरून पुनरागमन करताना नोव्हाकने हा सामना पाचव्या सेटमध्ये नेला. पाचव्या सेटमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली आणि नोव्हाकचा पारा चढलेला दिसला. त्या रागात त्याने रॅकेट नेटच्या खांबावर आपटून तोडले. पण, २० वर्षीय कार्लोस शांतपणे खेळला अन् दिग्गज खेळाडूला दमवून पहिले विम्बल्डन जेतेपद नावावर केले. विम्बल्डन जिंकणारा तो तिसरा स्पॅनिश खेळाडू ठरला. राफेल नदालने २००८ व २०१० मध्ये तर मॅन्यूएल सँटानाने १९६६ मध्ये विम्बल्डन जिंकली होती.
The Spanish sensation has done it 🇪🇸@carlosalcaraz triumphs over Novak Djokovic, 1-6, 7-6(6), 6-1, 3-6, 6-4 in an all-time classic#Wimbledonpic.twitter.com/sPGLXr2k99
— Wimbledon (@Wimbledon) July 16, 2023
सर्बियाच्या नोव्हाकने पहिला सेट ६-१ असा सहज जिंकून आघाडी घेतली. २०२२ मध्ये अमेरिकन ओपन जिंकणारा कार्लोस हार मानणाऱ्यांमधला नव्हता. दुसऱ्या सेटमध्ये त्याने नोव्हाकचा घाम काढला अन् टाय ब्रेकरमध्ये ७-६ ( ८-६) अशी बाजी मारली. हा विजय कार्लोसचा आत्मविश्वास उंचावणारा होता आणि त्याने तिसरा गेम ६-१ असा जिंकून सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. सामन्यात नोव्हाक फोरहँड मारताना थोडा संघर्ष करताना दिसला आणि त्यामुळे त्याच्या टीमची चिंता वाढली होती.
चौथ्या सेटमध्ये नोव्हाकने त्याचा क्लास दाखवून दिला.. कार्लोस कितीची चपळ असला तरी नोव्हाकच्या अनुभवासमोर टिकणे इतकं सोपं नाही, हे त्या युवा खेळाडूला कळून चुकले होते. कार्लोस २-१ असा आघाडीवर होता, परंतु नोव्हाकने अविश्वसनीय खेळ करून ४-२ अशी आघाडी मिळवली. कार्लोसचा खेळही अप्रतिम झाला अन् त्याने सातवा गेम जिंकून पिछाडी ३-४ अशी कमी केली. नोव्हाक हार मानणारा योद्धा नाही आणि त्याने पुढील दोन गेम जिंकून ६-३ अशी बाजी मारली आणि लढत २-२ अशी बरोबरीत आणली.
पाचव्या सेटमध्ये मॅच गेल्यावर नोव्हाकने आतापर्यंत ३७ सामने जिंकले आहेत आणि १० वेळाच हार झाली आहे, कार्लोसही ८ वेळा विजय मिळवून झाला आहे व केवळ एकदाच हरला आहे. त्यामुळे दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळणे अपेक्षित होते. कार्लोसने नेट जवळून मारलेले फटके नोव्हाकला अचंबित करणारे ठरले. पाचव्या सेटमधील दुसऱ्या गेममध्ये कार्लोसने सर्बियन खेळाडूला अक्षरशः कोर्टवर नाचवले आणि ३-१ अशी आघाडी मिळवली. त्यामुळे नोव्हाकचा पारा चढलेला पाहायला मिळाला आणि त्याने रॅकेटही तोडले. रेफरीने त्याला ताकीद दिली. ( Novak Djokovic loses his temper and slams his racquet on the post of the net)
निराश झालेल्या नोव्हाककडून चूका झाल्या आणि अर्थात त्याचा फायदा कार्लोसला झाला. त्याने ४-२ अशी आघाडी घेतली. कार्लोसचे वेगवान फटके वाखाण्याजोग होते, परंतु इथे नोव्हाकचा अनुभव कामी येणार होता आणि त्याने सातवा गेम घेत ३-४ अशी पिछाडी कमी केली. कार्लोस हार मानणारा नव्हता आणि त्याने पुढच्याच गेममध्ये ते दाखवून दिले. पुढच्या गेम नोव्हाकला जिंकून देताना कार्लोसने आता सामना हातात घेण्याचा निर्धार केला. सर्व्हिसच्या जोरावर त्याला हा सेट जिंकायचा होता आणि त्याने ६-४ अशी बाजी मारून पहिले विम्बल्डने जेतेपद नावावर केले.
कार्लोस अलकराझ १-६, ७-६ ( ८-६), ६-१, ३-६, ६-४ विजयी वि. नोव्हाक जोकोव्हीच