विम्बल्डन; नोव्हाक जोकोविचची घोडदौड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 04:16 AM2018-07-09T04:16:42+5:302018-07-09T04:16:59+5:30
सर्बियाचा माजी विजेता नोव्हाक जोकोविचने विम्बल्डन स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारताना ब्रिटनच्या काइल एडमंड याला चार सेटमध्ये नमविले. जपानच्या केई निशिकोरी यानेही विजयी कूच करताना चौथ्या फेरीत धडक मारली.
लंडन : सर्बियाचा माजी विजेता नोव्हाक जोकोविचने विम्बल्डन स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारताना ब्रिटनच्या काइल एडमंड याला चार सेटमध्ये नमविले. जपानच्या केई निशिकोरी यानेही विजयी कूच करताना चौथ्या फेरीत धडक मारली. त्याचवेळी, जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याचे आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात आले आहे. महिलांमध्ये जर्मनीच्या अँजेलिका कर्बेरने विजयी धडाका कायम राखत चौथी फेरी गाठली आहे.
२०१६ साली फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या जोकोविचने अपेक्षित खेळ केला. त्याने २ तास ५४ मिनिटांच्या रोमांचक लढतीत स्थानिक खेळाडू एडमंडचे कडवे आव्हान ४-६, ६-३, ६-२, ६-४ असे परतावले. पहिला सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतर जोकोविचने आक्रमक खेळ करताना एडमंडला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. जपानच्या निशिकोरी याने अनपेक्षित निकालाची नोंद करताना आॅस्टेÑलियाच्या निक किर्गियोसचे आव्हान ६-१, ७-६(७-३), ६-४ असे संपुष्टात आणले. निशिकोरीने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना बलाढ्य किर्गियोसला अखेरपर्यंत दबावाखाली ठेवण्यात यश मिळवले.
जर्मनीच्या युवा झ्वेरेवचे आव्हान मात्र अपेक्षेपेक्षा लवकर संपुष्टात आले. लात्वियाच्या अर्नेस्ट गल्बिस याने झ्वेरेवला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. ३ तास २० मिनिटांपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यात झ्वेरेवचा ६-७(२-७), ६-४, ७-५, ३-६, ०-६ असा पराभव झाला. सामना २-२ असा बरोबरीत आल्यानंतर निर्णायक पाचव्या सेटमध्ये झ्वेरेवला एकही गेम जिंकण्यात यश आले नाही.
महिलांमध्ये जर्मनीच्या कर्बेरने चौथी फेरी गाठली. २०१६ साली विम्बल्डनची उपविजेती ठरलेल्या कर्बेरने जपानच्या नाओमी ओसाका हिचा सरळ दोन सेटमध्ये ६-२, ६-४ असा धुव्वा उडवला. कर्बेरने जबरदस्त नियंत्रण राखताना केवळ १ तास ३ मिनिटांमध्ये बाजी मारली. (वृत्तसंस्था)
भारतीय जोडीचे आव्हान संपुष्टात
एन. श्रीराम बालाजी - विष्णू वर्धन या भारतीय जोडीचे आव्हान दुसºया फेरीत संपुष्टात आले. भारतीय जोडीला बेन मॅकलॅशन (जपान) - जॅन लेनार्ड स्ट्रफ (जर्मनी) या १४व्या मानांकीत जोडीविरुद्ध ६-७(२-७), ७-६(७-३), ६-७(३-७), ३-६ असा पराभव पत्करावा लागला. २ तास ४० मिनिटांपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात भारतीय जोडीने कडवा प्रतिकार केला. परंतु, अखेरच्या सेटमध्ये झालेल्या चुकांमुळे त्यांना स्पर्धेबाहेर पडावे लागले.