wimbledon tennis : ‘त्या’ तिघींसाठी यंदाचे विम्बल्डन विशेष महत्त्वाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 11:05 PM2018-06-30T23:05:12+5:302018-06-30T23:06:38+5:30
यंदाची विम्बल्डन टेनिस स्पर्धा तीन महिला टेनिसपटूंसाठी वेगळ्याच महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिकेची सेरेना विल्यम्स, झेक गणराज्याची पेट्रा क्विटोव्हा आणि बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेंका यांच्यासाठी ही पुनरागमनाची विम्बल्डन स्पर्धा आहे. या तिन्ही गेल्यावर्षी वेगवेगळ्या कारणांमुळे या स्पर्धेत खेळू शकल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यासाठी आॅल इंग्लंड क्लबच्या ग्रासकोर्टवरील विजेतेपदाचे वेगळेच महत्त्व राहणार आहे.
लंडन : यंदाची विम्बल्डन टेनिस स्पर्धा तीन महिला टेनिसपटूंसाठी वेगळ्याच महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिकेची सेरेना विल्यम्स, झेक गणराज्याची पेट्रा क्विटोव्हा आणि बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेंका यांच्यासाठी ही पुनरागमनाची विम्बल्डन स्पर्धा आहे. या तिन्ही गेल्यावर्षी वेगवेगळ्या कारणांमुळे या स्पर्धेत खेळू शकल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यासाठी आॅल इंग्लंड क्लबच्या ग्रासकोर्टवरील विजेतेपदाचे वेगळेच महत्त्व राहणार आहे.
सेरेना ही आपल्या बाळंतपणामुळे आणि त्यानंतर चिमुरड्या अॅलेक्सीसच्या देखभालीमुळे दीर्घकाळ टेनिसपासून लांबच होती. या बाळंतपणात आपला अक्षरश: पुर्नजन्म झाल्याचे ती सांगते. त्यामुळे तिचे पुन्हा ग्रासकोर्टवर उतरणे आणि आठव्या विम्बल्डन विजेतेपदाचे ध्येय ठेवणे हेच कौतुकास्पद आहे. अझारेंकासुध्दा ‘लिओ’ या मुलाची आई बनल्यापासून टेनिसपासून दूरच आहे.गेल्यावर्षीच्या आॅगस्टपासून तिचा मुलाच्ता ताब्यासाठी पतीसोबत कायदेशीर लढा सुरू आहे. त्यामुळे तिच्या परदेशी जाण्या-येण्यावर न्यायालयाने काही निर्बंध घातलेले होते. त्यातून खेळायची परवानगी मिळाल्यावर ती आता ग्रासकोर्टवर उतरणार आहे. पेट्रा क्विटोव्हावर २०१६ च्या डिसेंबरमध्ये तिच्या घरीच चोरीचा प्रयत्न करणाºया चोरट्याने चाकू हल्ला केला होता. त्यात तिच्या डाव्या हाताला गंभीर दुखापती झाल्या होत्या. दुर्देवाने क्विटोव्हा ही डावखुरी खेळाडू असल्याने तिला तर सहा महिने टेनिस रॅकेटला हातही न लावण्याचे डॉक्टरांनी सांगितले होते पण तिने पाचच महिन्यात पुन्हा खेळायला सुरूवात केलीे. मात्र त्यानंतर ती पाहिजे तसे यश मिळवू शकलेली नाही. याप्रकारे या तिन्ही खेळाडू दुखापतीतून किंवा व्यक्तिगत समस्यांतून सावरल्या असल्या तरी त्याचा त्यांच्यावर मोठा मानसिक ताण आहेच. त्याला मात देत आता मैदानावर यश मिळविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
आता अशा परिस्थितीत ३६ वर्षीय सेरेना जर यंदा विम्बल्डन जिंकली तर सर्वाधिक २४ ग्रँड स्लॅम विजेतेपदांच्या मार्गारेट कोर्टच्या विश्वविजेतेपदाची ती बरोबरी करेल. क्विटोव्हाने २०११ आणि २०१४ मध्ये विम्बल्डन अजिंक्यपद पटकावलेले आहे. त्यानंतर आता जर ती पुन्हा अजिंक्य ठरली तर तो मोठा भावनिक विजय असेल आणि अद्याप जिंकू शकली नसली तरी अझारेंकाने यापूर्वी दोन वेळा विम्बल्डनच्या उपांत्यफेरीपर्यंत धडक मारली आहे. त्यामुळे आपल्या मनात विशेष जागा दिलेली ही स्पर्धा जिंकणे हे तिचे स्वप्न आहे आणि ते साकार झाले तर ‘लिओ’च्या ताब्यासाठीच्या कायदेशीर लढाईनंतरचे तिचे हे सर्वात मोठे सुखदायी यश असेल.