युकी एटीपी रँकिंगमध्ये १0१ व्या स्थानावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 02:45 AM2018-02-20T02:45:40+5:302018-02-20T02:45:44+5:30
भारताचा अव्वल एकेरीतील खेळाडू युकी भांबरी याला ताज्या एटीपी एकेरी रँकिंगमध्ये ११ स्थानांचा फायदा झाला असून, तो १०१ स्थानावर पोहोचला आहे.
नवी दिल्ली : भारताचा अव्वल एकेरीतील खेळाडू युकी भांबरी याला ताज्या एटीपी एकेरी रँकिंगमध्ये ११ स्थानांचा फायदा झाला असून, तो १०१ स्थानावर पोहोचला आहे. युकीला चेन्नई ओपन चॅलेंजर स्पर्धेत केलेल्या सुरेख कामगिरीचा फायदा झाला. या स्पर्धेत तो उपविजेता ठरला होता.
अंतिम फेरीत आॅस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनकडून पराभूत झाल्यानंतर त्याला या स्पर्धेतून ४८ रँकिंग गुण आणि ४२४० डॉलरची पुरस्कार रक्कम मिळाली.
युकीनंतर एकेरी रँकिंगमध्ये रामकुमार रामनाथन (१४०), सुमित नागल (२१६) आणि प्रजनेश गुणेश्वरन (२४२) यांचा क्रमांक लागतो. युकीची कारकीर्दीतील सर्वोत्तम रँकिंग ८८ आहे जी की त्याने नोव्हेंबर २०१५ मध्ये मिळवली होती.
पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना (२०) आणि दिविज शरण (४२) यांच्या रँकिंगमध्ये कोणताही बदल झाला नाही; परंतु लिएंडर पेसचे दोन स्थानांनी नुकसान झाले असून त्याची ४९ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्यानंतर त्याचा जोडीदार पुरव राजा (५७) याचा क्रमांक लागतो. (वृत्तसंस्था)
महिलांच्या एकेरीत अंकिता रैना अजूनही अव्वल भारतीय खेळाडू आहे. तिची रँकिंग २५५ वी आहे. तिला दोन स्थानांचे नुकसान झाले आहे. करमन कौर थांडी हिचे तीन क्रमांकांनी नुकसान झाले असून ती २८१ व्या स्थानावर आहे. महिला दुहेरीत दुखापतीमुळे कोर्टपासून दूर असणारी सानिया मिर्झा रँकिंगमध्ये १४ व्या स्थानावर कायम आहे.