युकीची आगेकूच, सानियाची घसरण; रामनाथनचेही स्थान घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:05 AM2018-03-20T01:05:24+5:302018-03-20T01:05:24+5:30
भारतीय टेनिस स्टार युकी भांबरीने इंडियन वेल्स स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत एटीपीच्या ताज्या विश्व क्रमवारीत तीन स्थानांची प्रगती केली आहे, पण डब्ल्यूटीए मानांकनामध्ये सानिया मिर्झा महिला दुहेरीत अव्वल १५ मधून बाहेर झाली आहे.
नवी दिल्ली : भारतीय टेनिस स्टार युकी भांबरीने इंडियन वेल्स स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत एटीपीच्या ताज्या विश्व क्रमवारीत तीन स्थानांची प्रगती केली आहे, पण डब्ल्यूटीए मानांकनामध्ये सानिया मिर्झा महिला दुहेरीत अव्वल १५ मधून बाहेर झाली आहे.
इंडियन वेल्सच्या मुख्य ड्रॉच्या पहिल्या दोन राऊंडमध्ये आपल्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या खेळाडूंना पराभूत करणारा युकी आता क्रमवारीत १०७ व्या स्थानी पोहोचला आहे. पुरुष एकेरीत तो भारताचा सर्वोत्तम खेळाडू आहे. त्यानंतर रामकुमार रामनाथन (एका स्थानाने घसरण, १३६ व्या स्थानी) व सुमित नागल (पाच स्थानांची प्रगती, २१८ वे स्थान) यांचा क्रमांक येतो.
दुहेरीमध्ये रोहन बोपन्ना २० व्या स्थानी कायम आहे. तो दुहेरीमध्ये भारताचा अव्वल खेळाडू आहे. दिविज शरण (४४ वे स्थान) आणि डेव्हिस कप संघात पुनरागम करणारा अनुभवी लिएंडर पेस एका स्थानाच्या प्रगतीसह ४५ व्या स्थानी पोहोचला आहे. पुरव राजाची एका स्थानाने घसरण झाली असून तो ६३ व्या तर विष्णू वर्धन १०४ व्या स्थानी आहे.
सानिया डब्ल्यूटीए दुहेरी मानांकनामध्ये अव्वल १५ मधून बाहेर झाली आहे. दुखापतग्रस्त असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कोर्टपासून दूर असलेल्या सानियाची तीन स्थानांनी घसरण झाली असून ती १६ व्या स्थानी आहे. सानियाचे आता ३८१० मानांकन अंक आहेत. (वृत्तसंस्था)