झ्वेरेव, डेल पेट्रो उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 11:45 PM2018-03-02T23:45:24+5:302018-03-02T23:45:24+5:30
द्वितीय मानांकीत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव, सहावा मानांकीत अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पेट्रो आणि पाचव्या मानांकीत दक्षिण आफ्रिकेच्या केविन अंडरसन या नामांकीत खेळाडूंनी आपआपल्या सामन्यात बाजी मारताना मेक्सिको ओपन एटीपी टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
अकापुल्को (मेक्सिको) : द्वितीय मानांकीत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव, सहावा मानांकीत अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पेट्रो आणि पाचव्या मानांकीत दक्षिण आफ्रिकेच्या केविन अंडरसन या नामांकीत खेळाडूंनी आपआपल्या सामन्यात बाजी मारताना मेक्सिको ओपन एटीपी टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे डेल पेट्रो याने विजयी कूच करताना तिस-या मानांकीत आॅस्ट्रियाच्या डॉमनिक थिएम याचे तगडे आव्हान संपुष्टात आणले.
१ तास ४२ मिनिटांपर्यंत रंगलेल्या सामन्यात पहिला सेट सहजपणे जिंकून डेल पेट्रोने सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. परंतु, दुसºया सेटमध्ये थिएम याने जबरदस्त पुनरागमन करताना सेट टायब्रेकमध्ये नेला. यावेळी थिएम सामना निर्णायक तिसºया सेटमध्ये नेणार असेच चित्र होते. परंतु, डेल पेट्रोने आपली पकड न सोडता मोक्याच्यावेळी गुणांची कमाई करताना अखेर ६-२, ७-६(७) अशी बाजी मारत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
दुसरीकडे स्पर्धेतील संभाव्य विजेता मानला जात असलेल्या झ्वेरेव याने अपेक्षित कामगिरी करताना अमेरिकेच्या रायन हॅरिसन याचा ६-४, ६-१ असा सहजपणे धुव्वा उडवला. केवळ १ तास ६ मिनिटांमध्ये विजयावर शिक्का मारताना झ्वेरेव याने रायनला पुनरागमनाची फारशी संधी दिली नाही. याआधी अमेरिकेच्या आठव्या मानांकीत जॉन इस्नरला धक्का देत स्पर्धेत खळबळ माजवलेल्या रायनच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, झ्वेरेवच्या आक्रमक खेळापुढे त्याचा काहीच निभाव लागला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन याने विजयी घोडदौड कायम राखताना कोरियाच्या ह्युओन चुंग याचे कडवे आव्हान ७-६(५), ६-४ असे परतावले. चुरशीच्या झालेल्या या लढतीत अंडरसनने १ तास ५२ मिनिटांमध्ये विजय मिळवला.
अन्य लढतीत अमेरिकेच्या जॅरेड डोनाल्डसन याने विजयी कामगिरीसह उपांत्य फेरीत प्रवेश करताना स्पेनच्या फेलिसियानो लोपेझ याचा ६-३, ६-१ असा पाडाव केला. आता त्याच्यापुढे बलाढ्य केविन अँडरसन याचे तगडे आव्हान असेल. दुसºया उपांत्य फेरीत डेल पेत्रो आणि झ्वेरेव अशी रोमांचक लढत रंगेल. (वृत्तसंस्था)