भिवंडीत मानसरोवर ,फुलेनगर येथील नागरी समस्यांविरोधात भाजपाची निदर्शने
By नितीन पंडित | Published: January 20, 2023 02:51 PM2023-01-20T14:51:50+5:302023-01-20T14:53:17+5:30
या भागातील फेणे पाडा येथील अनधिकृत डम्पिंग ग्राऊंडचा विषय गंभीर असून तेथे खाजगी व्यक्ती कडून वराह पालन व्यवसाय केला जात आहे, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
भिवंडी : भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील मानसरोवर,फुलेनगर,फेणे पाडा या भागातील नागरी समस्यांबाबत पालिका आयुक्त यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करून ही प्रशासन लक्ष देत नसल्याने भाजपाचे स्थानिक माजी नगरसेवक शाम अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी स्थानिकांनी मानसरोवर महात्मा फुले चौक या ठिकाणी निदर्शने करून आपला निषेध नोंदवला आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी, आरपीआय शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड, राजू गाजंगी, निष्काम भैरी, दीपक झा, सागर येल्ले यांच्यासह मानसरोवर, फेणेपाडा, फुलेनगर परिसरातील नागरीक, महिला व शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या भागातील फेणे पाडा येथील अनधिकृत डम्पिंग ग्राऊंडचा विषय गंभीर असून तेथे खाजगी व्यक्ती कडून वराह पालन व्यवसाय केला जात आहे, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर मानसरोवर परिसर,धापसी पाडा,गावदेवी मंदिर,फेणागांव, गणेश नगर आणि महात्मा ज्योतिबा फुले चौक ते कामतघर या परिसरातील रस्त्यांची दुरावस्था असून गटार व पाथवेजची दुरावस्था झालेली आहे.या भागात अनेक ठिकाणी गटरी मधील सांडपाणी आणि गाळ रस्त्यावर येत आहे ज्यामुळे दुर्गंधी पसरत असून रस्त्यावरून चालतांना त्रास होतो.तसेच परिसरातील डाईंग आणि सायझिंग मधून बाहेर पडणारा धूर यामुळे मानसरोवर परिसरात नागरीकांच्या आरोग्य देखील धोक्यात आले आहे.
मनपा प्रशासनास याबाबत वारंवार निवेदने व तक्रारी केल्या नंतरही मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आज या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शाम अग्रवाल यांनी दिली. तर येत्या महिना भरात न केल्यास कोणतीही सूचना न देता पालिका मुख्यालयास टाळे ठोकण्यात येईल असा इशारा भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी यावेळी दिला. पालिका प्रशासनाच्या वतीने उपायुक्त दीपक झिंजाड यांनी निदर्शन स्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारीत या नागरी समस्यांची सोडवणूक करण्यसाठी तातडीने पावले उचलण्यात येतील असे आश्वासन दिले नंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.यावेळी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त परिसरात ठेवला होता.