कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी ९० ईव्हीएम-व्हीव्हीपॅट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:18 AM2019-09-24T00:18:40+5:302019-09-24T00:18:49+5:30
१८ मतदारसंघ : प्रत्येकी पाच मशीन
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या कामकाजाचे जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जय्यत तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी १८ विधानसभा मतदारसंघांच्या कार्यालयांना प्रत्येकी पाच ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचा पुरवठा करण्यात आला आहे. या मशीनद्वारे खास प्रशिक्षण अधिकारी, कर्मचाºयांना दिले जाणार आहे.
ईव्हीएम वापरण्यासह व्हीव्हीपॅट मशीन मतदानकेंद्रावर कसे हाताळण्यात यावे, यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम लवकरच आयोजित केले जाणार आहेत. त्यासाठी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचा पुरवठा आचारसंहिता लागू होताच करण्यात आला. या मशीन सरावासाठी वापरण्यात येणार आहेत. त्यावर उत्तम सराव झाल्यानंतर मतदानकेंद्रांवर उद्भवणाºया समस्येवर संंबंधित अधिकारी व कर्मचाºयांना मात करणे शक्य होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत कोपरी येथे असलेले गोडाउन आता तुर्भे येथे हलवण्यात आलेले आहे.
तुर्भे येथील केंद्रीय धान्य महामंडळाच्या गोदामात जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांसाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आलेले आहेत. या गोदामांमधून आवश्यक त्या साहित्याचा पुरवठा मतदारसंघांच्या कार्यालयांना केला जात आहे. मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य या गोदामांमधून कंटेनर व ट्रकद्वारे ठिकठिकाणी पोहोवले जाणार आहेत. त्या परिसरात वाहने उभी राहण्यासाठी व वळवण्यासाठीही मोठे मैदान असल्यामुळे तुर्भे येथे कोपरीतील साहित्य नेले आहे. यापुढे या गोदामांमधून साहित्य जिल्ह्यातील सर्व मतदारसंघ व मतदानकेंद्रांवर पोहोच करण्याचे नियोजन केले आहे.