राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत १ कोटी ४२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
By अजित मांडके | Published: April 22, 2024 03:47 PM2024-04-22T15:47:36+5:302024-04-22T15:49:07+5:30
मोठी कारवाई, १७० जणांना अटक
ठाणे : राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या भरारी पथकाने लोकसभा निवडणुकीची १६ मार्चला आचारसंहिता लागल्यापासून १९ एप्रिल पर्यंत कारवाई केली. यात सुमारे १ कोटी ४२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यात ९० लाखाचा अवैध मद्य साठ्यांचा समावेश आहे. तर १७० जणांना अटक करण्यात आली असून एकूण २७६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे फ्लाईंग स्कॉडच्या दोन पथकानी ठाणे, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, डोंबिवली आदी पट्ट्यात ही कारवाई केली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून अवैध दारुवर कारवाई करण्यासाठी ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे फ्लाईंग स्कॉर्डने कंबर कसली होती. यात १६ मार्च ते १९ एप्रिल या कालावधीत या पथकाने रसायन, हातभट्टीचे देशी मद्य, विदेशीमद्य, बिअर, वाईन, शॅमपेयन, बनावट मद्य, ताडी, काळा गुळ आदी कारवाई करून जप्त केली आहे यांत एकूण २७६ गुन्हे दाखल आहेत. त्यात १६८ वारस गुन्हे तर १०८ बेवारस गुन्हे दाखल आहेत.
एकूण १७० जणांना अटक झाली असून ९ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत १ कोटी ४२ लाख ६३ हजार २८० रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला. ठाणे जिल्ह्यात खाडीकिनारी खारपुट्टीच्या जंगलात अगदी आत मध्ये गावठी दारूच्या हातभट्ट्या लावल्या जातात.तिथे जाण्यासाठी अशा दारू माफियांच्या स्वताच्या बोटी आहेत. या बोटीतून आता हे माफिया गावठी दारूची ने आण करतात. अनेक वेळा स्थानिक पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून अशा भट्ट्यावर कारवाई करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात अवैध मदयसाठा, बनावट मदय, त्याची वाहतूक आणि विक्री. हे प्रकार रोखण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन विशेष भरारी पथकाची निर्मिती केली आहे. या पथकात एक निरीक्षक,दोन उपनिरीक्षक,चार कॉन्स्टेबल, एक वाहक अशा आठ जणांचा समावेश आहे.